बॅरिकेड्स हटविण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
पहिल्या रेल्वेगेटनजीक गेल्या सात वर्षांपासून लावण्यात आलेले बॅरिकेड्स नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या बॅरिकेड्समुळे टिळकवाडी पूर्व आणि पश्चिमचा संपर्कच तुटला आहे. सातत्याने आंदोलन करूनही हे बॅरिकेड्स हटविण्यात आले नाहीत. निदान आता पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेऊन तरी हे बॅरिकेड्स हटवावेत, अशा आशयाचे निवेदन सुभाष घोलप यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांना दिले.
बॅरिकेड्स हटविण्यासाठी शनिवारी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरण्याचे घोलप यांनी जाहीर केले होते. मात्र, शनिवारी पोलिसांनी त्यांना धरणे आंदोलन करण्यासाठी रोखले. त्यानंतर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन घोलप यांनी त्यांना निवेदन दिले.
गेल्या सात वर्षांपासून हे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही भागांचा संपर्क तुटला आहे. या शिवाय जनावरे, वृद्ध, विद्यार्थी यांना येथून ये-जा करणे कठीण होत आहे. पेट्रोलचे दर भरमसाट वाढले असून निष्कारण वाहन चालकांना वळसा घालून ये-जा करावी लागते. प्रादेशिक आयुक्त बॅरिकेड्स हटविण्याची सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टीकाही घोलप यांनी केली.
दुसऱया रेल्वेगेटजवळ पोलीस असतात. त्याप्रमाणे पहिल्या रेल्वेगेटजवळ पोलिसांची नियुक्ती करावी किंवा येथील सिग्नल सुरू करावेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊ शकते. मात्र, लोकांची गैरसोय करणारे बॅरिकेड्स त्वरित हटवावेत, अशी मागणी त्यांनी केली.