विश्वचषक विजेत्या इंग्लंडला 7 गडय़ांनी दणका, डी कॉकचे शतक, बवुमाचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ केपटाऊन
कर्णधार क्विन्टॉन डी कॉकने झळकवलेले चमकदार शतक आणि टेम्बा बवुमाच्या 98 धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या वनडे सामन्यात विश्वचषक विजेत्या इंग्लंडवर 7 गडय़ांनी दणदणीत विजय मिळविला. डी कॉकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. ध्gसरा सामना दरबानमध्ये शुक्रवारी आणि तिसरा व शेवटचा सामना रविवारी जोहान्सबर्गमध्ये होणार आहे.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर इंग्लंडने आघाडी लवकर बाद झाल्यानंतरही निर्धारित 50 षटकांत 8 बाद 258 धावा जमविल्या. त्यात जो डेन्लीच्या शानदार अर्धशतकाचा (87) समावेश होता. पण डी कॉक व बवुमा यांनी दुसऱया गडय़ासाठी 173 धावांची भागीदारी करीत संघाला 14 चेंडू बाकी ठेवत सहज विजय मिळवून देत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मागील वर्षी विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर इंग्लंडचा हा पहिलाच वनडे सामना होता.
विश्वचषकात खेळलेल्या फक्त पाचच खेळाडूंना या सामन्यात इंग्लंडने संधी दिली होती. भेन स्टोक्स, जोस बटलर यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ख्रिस वोक्स हा त्यांचा विश्वचषकातील एकमेव गोलंदाज या संघात खेळत होता. द.आफ्रिकेने रीझा हेन्ड्रिक्सचा (6) बळी लवकर गमविला. वोक्सच्या गोलंदाजीवर त्याला यष्टिरक्षक बेअरस्टोने त्याचा झेल टिपला. डी कॉक व बवुमा यांनी सफाईदार फटकेबाजी करीत जवळपास पावणेदोनशेची भागीदारी करून विजय सोपा केला. डी कॉकने 106 चेंडूत 15 वे शतक नोंदवले. पार्टटाईम गोलंदाज जो रूटने त्याला त्रिफळाचीत करून त्याची खेळी संपुष्टात आणली. त्याने 113 चेंडूत 11 चौकार, एका षटकारासह 107 धावा फटकावल्या.
केवळ तिसरा वनडे सामना खेळणारा बवुमा शतकानजीक पोहोचला होता. पण शतक दोन धावांवर असतानाच ख्रिस जॉर्डनने त्याला पायचीत करीत शतकापासून वंचित ठेवले. बवुमाने त्याने 103 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 98 धावा जमविल्या.
तत्पूर्वी, इंग्लंडने चमकदार सुरुवात करताना 10 षटकांतच बिनबाद अर्धशतक नोंदवले. पण त्यांचे नंतरचे पाच फलंदाज केवळ 57 धावांची भर घालून बाद झाले. जेसन रॉय (32) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. पण जॉन जॉन स्मुट्सने त्याला हेन्ड्रिक्सकरवी झेलबाद केले. नंतर बेअरस्टो (19) फेहलुक्वायोच्या गोलंदाजीवर बाद झाला. रासी व्हान डर डुसेनने चपळ क्षेत्ररक्षण करीत रूटला (17) धावचीत केले तर कर्णधार मॉर्गन (11) स्लिपमध्ये तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानंतर यजमान संघाने वर्चस्व मिळविले. लेगस्पिनर शम्सीने पदार्पणवीर टॉम ब्लंडेल (18) व सॅम करन (7) यांनाही बाद केले. मात्र डेन्ली व वोक्स (42 चेंडूत 40) यांनी सातव्या गडय़ासाठी 91 धावांची भागीदारी करीत इंग्लंडला अडीचशेची मजल मारून दिली.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकांत 8 बाद 258 : रॉय 32 (32 चेंडूत 5 चौकार), बेअरस्टो 19, रूट 17, मॉर्गन 11, डेन्ली 87 (103 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), ब्रॅन्टन 18, करन 7, वोक्स 40 (42 चेंडूत 2 चौकार), टी.करन नाबाद 15, जॉर्डन नाबाद 1, अवांतर 11. गोलंदाजी : हेन्ड्रिक्स 1-46, शम्सी 3-38, स्मुट्स 1-43, फेहलुक्वायो 1-47, सिपाम्ला 1-40.
द.आफ्रिका 47.4 षटकांत 3 बाद 259 : डी कॉक 107 (113 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), हेन्ड्रिक्स 6, बवुमा 98 (103 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), व्हान डर डुण्सेन नाबाद 38 (45 चेंडूत 3 चौकार), स्मुट्स नाबाद 7 (11 चेंडूत 1 चौकार), अवांतर 3. गोलंदाजी : वोक्स 1-36, रूट 1-35, जॉर्डन 1-31.