कोलकाता
फिफाच्या महिला फुटबॉल मानांकनात भारताला पहिल्या 40 संघामध्ये स्थान मिळविण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन भारतीय महिला फुटबॉलपटू बाला देवीनी केले. विदेशातील फुटबॉल क्लबमध्ये करारबद्ध होणारी बाला देवी ही भारताची पहिली महिला फुटबॉलपटू आहे. सध्या तिचे वास्तव्य ग्लॅस्गोमध्ये आहे. ग्लॅस्गोमधील एका इमारतीमध्ये बाला देवी आणि रेंजर्स एफसी महिला संघातील अन्य चार फुटबॉलपटूचे वास्तव्य आहे. फिफाच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय महिला फुटबॉल संघ सध्या 55 व्या स्थानावर आहे.
स्कॉटलंडमध्ये बाला देवीला विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सध्या बंद करण्यात आली असल्याने बाला देवीला मायदेशी येणे अवघड झाले आहे पण ती दररोज आपल्या कुटुंबियाशी दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे. बाला देवी मणीपूरमध्ये राहते. भारतीय माहिला फुटबॉल संघाची अलिकडच्या कालावधीत समाधानकारक कामगिरी होत असून या संघामध्ये बऱयापेकी सुधारणा होत आहे. नजिकच्या काळात भारतीय संघाला पहिल्या 40 संघात स्थान मिळविण्याची संधी असल्याचे बाला देवीने म्हटले आहे.