पुदुच्चेरी / वृत्तसंस्था
काँगेसच्या आणखी एका आमदाराने विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर असताना राजीनामा दिल्याने पाँडिचेरीतील काँगेस सरकार अल्पमतात आले आहे. राहुल गांधीच्या दौऱयाआधी एक दिवस काँगेसला हा धक्का बसला. जॉन कुमार असे राजीनामा दिलेल्या आमदाराचे नाव असून ते कामराजनगरचे आमदार होते.
पाँडिचेरी हा केंद्रशासित प्रदेश असून तेथील विधानसभेचे संख्याबळ 30 आहे. बहुमतासाठी 16 जागांची आवश्यकता आहे. कुमार यांच्या राजीनाम्यामुळे काँगेसप्रणित सरकारची सदस्यसंख्या 14 राहिली असून ते अल्पमतात आले. सध्या काँगेसकडे 10 आमदार असून या पक्षाला द्रमुकच्या 3 आमदारांचा तर एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते.
काही दिवसांपूर्वी ए. नमसिवायम आणि मल्लादी कृष्णा राव या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर ई. थिप्पय्यानाथ या आमदाराने राजीनामा दिला. मंगळवारी जॉन कुमार यांनी राजीनामा दिला. नमसिवायम आणि थिप्पय्यानाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर काँगेसचे आणखी एक आमदार एन. धनवेलू यांचे पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षातून निलंबन करण्यात आले.