प्रतिनिधी / दहिवडी :
शिरवळ येथे कामावर निघालेल्या गोंदवले बुद्रुक (ता.माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी (माण) येथे भीषण अपघात झाला. यामध्ये सूर्यकांत लाला जाधव (वय 30) याचा जागीच मृत्यू झाला तर महेश बबन कट्टे (27) हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
शिरवळ येथील एमआयडीसीत कामाला असलेला सूर्यकांत जाधव व महेश कट्टे हे दुचाकी वरून निघाले होते.पांगरी जवळ आल्यानंतर बिरोबा मंदिरा नजिक ओढयावरील पुलावर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात त्याच्या दुचाकीची फलटणहून येत असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी पुलाच्या दुसऱ्या बाजूला शंभर फुटापर्यंत ट्रकने फरपटत नेली. यामध्ये जबर मार लागल्यामुळे सूर्यकांत याचा जागीच मृत्यू झाला. तर महेश गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती समजताच दहिवडीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. दोघांनाही ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे आणण्यात आले. जाधव याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर कट्टे याला अधिक उपचारासाठी सातारा येथे पाठविण्यात आले. अधिक तपास दहिवडी पोलिस करीत आहेत.