प्रतिनिधी / भोर :
भोर तालुक्यातील भाटघर धरण जलाशय भागातील अतिदुर्गम डोंगरी भागातील पांगारी येथे चार-पाच वर्ष वयाचा बिबटय़ा मृतावस्थेत आढळला आहे. भोरचे वन परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांनी यासंदर्भात माहिती दिली.
भोर तालुक्यात बिबटय़ांचा वावर वाढला असून बिबटय़ाच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा बळी गेल्याच्या अनेक घडल्या आहेत. मात्र, पांगारी येथे डोंगर रानात बिबटय़ाचा मृत्यू होण्याची पहिलीच घटना घडली असून, बिबटय़ाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वन विभागाने गणेशखिंड येथील शासकिय न्याय वैधक प्रयोग शाळेत बिबटय़ाचा व्हिसेरा पाठवला आहे. प्रयोग शाळेच्या अहवालानंतरच बिबटय़ाचे मृत्यूचे कारण समजेल, असे वन परिक्षेत्र अधिकारी मिसाळ यांनी सांगितले.
दरम्यान, मृत बिबटय़ाचा पंचनामा करुन पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. वेदपाठक यांनी शवविच्छेदन केले. यावेळी उपविभागीय वनाधिकारी आशा भोंग, वन परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ, वनपल एस. एस. बगाडे, एस. के. होनराव, वनरक्षक पूनम माने,के. पी. देठे, हिमोने, अडागळे, व पांगारी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.