इच्छूक उमेदवार समील वळवईकर यांचे उत्तर
प्रतिनिधी /पणजी
कुंभारजुवेचे मतदारसंघाचे आमदार पांडुरंग मडकईकर यांची पायाखालची वाळू घसरल्याने ते बालिश वक्तव्ये करुन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इच्छूक असलेल्या आपल्यासारख्या व अन्य नव्या दमाच्या तरुणांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप कुंभारजुवे मतदारसंघातील समाजकार्यकर्ते तथा इच्छूक उमेदवार समील वळवईकर यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना वळवईकर म्हणाले की आपण त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र त्यांनी भासविण्याचा प्रयत्न केला असला तरी तो धादांत खोटारडेपणा आहे. उलट तेच आपल्यापर्यंत संदेश पाठवून ‘आपल्याला शेवटचा पाठिंबा दे, शेवटची एकच वेळ आपल्याला आमदार बनण्याची संधी दे. तू मला मदत कर,’ असे सांगत आहेत, असे वळईकर म्हणाले.
आपण गेली वीस वर्षे समाजकार्य केले आहे. जे कार्य मडकईकर यांच्या नावावर जात होते, ते कार्यही आमचे कार्यकर्ते करत होते. हे कार्य जनतेला माहीत आहे. पण शरीर साथ देत नसातानाही सार्वजनिक पदाला चिकटून राहणाऱया मडकईकरांना नव्या दमाच्या तरुणांना संधी द्यावी, असे वाटत नाही. आपण त्यांच्याबरोबर नाही, कार्यर्तेही माझ्याबरोबर आहेत, हे वास्तव त्यांना दिसले आहे. मला मिळणारा मतदारांचा व कार्यकर्त्यांचा पाठिंबा पाहून ते सैरभैर झाले आहेत. त्यांनी कितीही बालिशपणा केला तरी आपण तसे करु शकत नाही. राजकारणात बहुतेकजण सत्तेत राहण्याचा, पदे मिळविण्याचा प्रयत्न करतात. आपणही सत्ताधारी कार्यकर्ता होतो. चांगली जबाबदारी, पदेही होती. या सर्वाचा त्याग करुन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आपण मतदारांच्या बरोबर आणि मतदार माझ्याबरोबर आहेत. कोरोना महामारीच्या दोन्ही लाटेत मडकईकर हे आमदार म्हणून कुठे दिसलेच नाहीत. राज्यातील अन्य काही आमदार चांगले काम करत होते. सत्ताधारी पक्षाचा मतदारसंघ असूनही मडकईकर यांच्यामुळे आमच्या मतदारसंघाची अवस्था बिकट झाली आहे. त्यांनी मतदारांना वाऱयावर सोडले म्हणून आम्ही कार्यकर्ते सोडू शकत नाहीत, म्हणून आपण त्यांच्या संपर्कात राहिलो, आणि शक्य ती सर्व मदत दिली. मतदार, कार्यकर्ते मिळून आपण सारे एकत्र येऊन सर्वांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसारच पुढचेही निर्णय घेतले जातील, असेही ते म्हणाले.