राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : दोन दुकांनाचे परवाने निलंबित
प्रतिनिधी/ दहिवडी
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंद असताना ही दारूची विक्री करत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. त्या अनुषांगाने विभागाने पांढरवाडी ता.माण येथील दारू विक्री करणाऱया दोघांना छापा टाकून अटक केली आहे. संजय हरिश्चंद्र धमाळ, (वय 42 वर्षे रा. पांढरवाडी ता. माण), महावीर मारुती पिसे (वय 50 वर्षे रा. माण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कारसह 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर परमीटरुम दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती अशी, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क सातारा विभाग सतर्क झाला आहे. राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक भरारी पथक सातारा व दुय्यम निरीक्षक कोरेगाव यांच्या संयुक्त पथकाने दि. 25 रोजी पांढरवाडी (ता. माण जि. सातारा) या ठिकाणी अवैधरित्या चालत असलेल्या दारू विक्रीवर मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला.
त्याठिकाणी मारुती स्विफ्ट गाडीमध्ये 480 बॉटल्स देशी दारू व 48 बॉटल्स विदेशी दारू असा एकूण 2 लाख 10 हजार 720 रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला. मुद्देमाल हॉटेल पूनम परमिट रूम व पिसे देशी दारू दुकानातून आणल्याचे संशयितांनी सांगितले. थ्यानंतर त्याठिकाणी तपासणी केली असता हॉटेल पूनम व पिसे दारु दुकान याचे सिल तोडलेले निदर्शनास आले असून तपासणी केली असता मुद्देमालाची तफावत आढळून आली. संजय हरीचंद्र धमाळ व महावीर मारुती पिसे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या कारवाईत दुय्यम निरीक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरीक्षक महेश गायकवाड, जवान नितीन जाधव, सचिन खाडे, अजित रसाळ, अजित घाडगे, आपासाहेब काळे, किरण जंगम सहभागी झाले होते. जिल्हाअधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार दुकानाचा परवाना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.