महालक्ष्मी लेआऊटकडे जाणाऱया रस्त्याची वाताहत : पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाय-योजना राबवण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबवून शहराच्या कायापालट करण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालविला आहे. मात्र पाईपलाईन रोड परिसरात निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. बुडाने निर्माण केलेल्या वसाहतीजवळ गटारीअभावी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. सदर सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाय-योजना राबवावी, अशी मागणी होत आहे.
एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोटय़वधीचा निधी खर्ची घातला जात आहे. तर दुसरीकडे लहान समस्यांकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. लक्ष्मीटेकडी योजना क्रमांक 51 च्या परिसरात महालक्ष्मीनगरकडे जाणाऱया रस्त्याशेजारी गटारी नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. महानगरपालिका व ग्रा. पं. ची हद्द असल्याने या परिसरातील समस्यांचे निवारण कोण करणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. पाईपलाईन शेजारी एका बाजूला बुडाची वसाहत तर रस्त्याच्या दुसऱया बाजूला हिंडलगा व बेनकनहळ्ळी ग्रा. पं. ची हद्द सुरू होते. मनपातर्फे विविध विकासकामे राबविली जातात. मात्र या परिसरातील समस्यां निवारणासाठी कोणताच आराखडा तयार केला नाही.
तक्रारीकडे दुर्लक्ष
परिणामी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महालक्ष्मीनगरकडे जाणाऱया रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली असून नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील रस्त्यामुळे वाहनधारक हैराण झाले असून सातत्याने तक्रार करूनही दुरूस्ती केली जात नाही.
बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्या हद्दीतील रस्त्याचा वापर महानगरपालिका हद्दीतील वाहनधारक करीत असतात. पण दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्त्याच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. रस्त्याला उतार असल्याने खडीमय झालेल्या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक घसरून पडत आहेत. रस्त्याच्या बाजूला गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पाईपलाईन पेट्रोलपंपशेजारी सांडपाणी साचून राहत असून वाहनधारकांच्या अंगावर उडत असते. सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीच उपाय-योजना राबविण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरात विविध व्यवसाय करणाऱया नागरिकांना दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील सांडपाण्यामुळे वाहतुकीसही अडचण होत आहे. त्यामुळे येथील समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.