संदीप बोडवे/ देवबाग
महाराष्ट्रात पहिल्यांदाच देवबाग-तारकर्ली येथे संरक्षित करण्यात आलेल्या ‘ग्रीन सी टर्टल’ या समुद्री कासवाच्या घरटय़ातून शनिवारी 74 पिल्ले बाहेर आली. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान पहिले पिल्लू घरटय़ातून बाहेर आले. त्यानंतर दुपारपर्यंत एकेक करून बाकीची पिल्ले घरटय़ाबाहेर येत समुद्रात झेपावली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱयावर मोठी गर्दी केली होती. हे घरटे येथील पंकज मालंडकर यांनी संरक्षित केले होते.
दरम्यान, ही घटना महाराष्ट्राच्या कासव संवर्धन मोहिमेत सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली असल्याचे सांगत, येथील स्थानिक पर्यावरण रक्षकांचे अभिनंदन करीत आहोत, असे कांदळवन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले.
देवबाग-तारकर्ली किनारपट्टीवर समुद्री कासवाने अंडी घालून घरटे बनविल्याची घटना येथील कासव मित्र पंकज मालंडकर यांनी 11 जानेवारी रोजी उजेडात आणली होती. सुरुवातीला हे घरटे ऑलिव्ह रिडले या सागरी कासव प्रजातीची असल्याचे बोलले जात होते. परंतु या कासवाचे फोटो आणि व्हीडिओ कांदळवन विभागाच्या अधिकाऱयांना पाठविण्यात आले.
फोटो आणि व्हीडिओमधील कासव हे ‘ऑलिव्ह रिडले’ या सागरी कासव प्रजातीपेक्षा काहीसे वेगळे वाटत असल्याचे कांदळवन विभागाच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास येताच त्यांनी कासव अभ्यासकांशी याबाबत चर्चा केली. सखोल माहितीसाठी सदरील फोटो आणि व्हीडिओ बेंगलोर येथील वाईल्ड लाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे कासव अभ्यासक नुपूर काळे यांना पाठविण्यात आले. काळे यांनी या फोटो आणि व्हीडिओंचा अभ्यास केल्यानंतर सदरील कासव हे ग्रीन सी टर्टल असण्यावर शिक्कामोर्तब केले होते.
शनिवारी ‘ग्रीन सी टर्टल’चा जन्मोत्सव
ग्रीन सी टर्टलने अंडी घालून घरटे बनविल्यानंतर 52 दिवसांनी ग्रीन सी टर्टलच्या घरटय़ामधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी कासवाची पिल्ले घरटय़ामधून बाहेर येतील, याचा घरटय़ाचे रक्षक पंकज मालंडकर यांना पहिल्यापासून अंदाज असल्यामुळे ते शनिवारीपहाटे पासूनच घरटय़ाजवळ पहारा देत होते. दुपारी तीन वाजेपर्यंत घरटय़ांमधून 74 पिल्ले बाहेर आली, तर तीन अंडी खराब निघाली. ही अंडी संरक्षित करण्यासाठी पंकज याच्याबरोबरच एमटीडीसी इसदाच्या कर्मचाऱयांचे सहकार्य लाभले. सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यावेळी कांदळवन प्रतिष्ठानचे सागरी जीव अभ्यासक हर्षल कर्वे, रोहित सावंत, दुर्गा ठिगळे, यांसह इसदाचे कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कासव घरटय़ाचे संरक्षण केलेल्या पंकज मालंडकर यांच्या आई अनिता या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.
दुर्मिळ ग्रीन सी टर्टल
ग्रीन सी टर्टल या समुद्री कासव प्रजातीची भारतात फक्त गुजरात आणि लक्षद्वीप येथे घरटी आढळून येतात. या कासवाच्या खालील कवचाच्या बाजूला ग्रीन रंगाचे फॅट असते म्हणून याला ग्रीन सी टर्टल असे संबोधले जाते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी टर्टल, हॉक्स बिल, लॉगर हेड आणि लेदर बॅक अशा पाच प्रजाती आढळून येतात. त्यापैकी ऑलिव्ह रिडले महाराष्ट्राच्या किनाऱयावर अंडी घालून घरटी बनवितात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळून येणाऱया कासावांमध्ये ग्रीन सी टर्टल आणि लेदर बॅक ही आकाराने मोठी असणारी कासवे आहेत. ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाला अंडी देण्यासाठी पूर्ण वाढ होण्यास 20 ते 30 वर्षांचा कालावधी लागतो.
पिल्लांना सतत धोका
एखाद्या समुद्री कासवाने किनाऱयावर येत घरटे बनविल्यानंतर जन्माला येणारे कासव पूर्ण वाढ होईपर्यंत त्याला अनेक शत्रूंचा सामना करावा लागतो. घरटय़ात असताना अंडी चोरी होणे तसेच मुंगुस, कोल्हे, किंवा अन्य प्राण्यांपासून त्यांना सतत धोका असतो. पिल्ले अंडय़ातून बाहेर आल्यावर घार, कावळे आदी पक्षी त्यांना खाऊ शकतात. तसेच समुद्रात मोठे मासे, शार्क, मासेमारीची जाळी आणि घोस्ट नेस्ट यांचा लहान पिल्लांना धोका असतो.
सिंधुदुर्गाच्या समुद्रात ग्रीन सी टर्टलचा अधिवास
सिंधुदुर्गच्या समुद्रामध्ये सी ग्रास आढळते आणि ग्रीन सी टर्टल हे समुद्री गवत खातात. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाळ्य़ात अडकलेल्या कासवांच्या माहितीचा अभ्यास केला, तर फक्त सिंधुदुर्गात अन्य किनारी जिल्हय़ांच्या तुलनेत ग्रीन सी टर्टल हे कासव जाळय़ात सापडल्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे.
कांदळवन प्रतिष्ठानचे सागरी जीव अभ्यासक हर्षल कर्वे म्हणाले, महाराष्ट्रात आढळलेले ग्रीन सी टर्टलचे हे पहिलेच नेस्ट असल्यामुळे आम्ही याचा अभ्यास करणार आहोत. या घरटय़ातील अंडय़ांचे प्रमाण, त्यापैकी बाहेर आलेली पिल्लांची संख्या आणि लागलेला कालावधी या माहितीचा आम्ही पुढील काळात ग्रीन सी टर्टलचा अधिवास जतन करण्यासाठी उपयोग करणार आहोत.