22 ऑक्टोबर पूर्वी उत्तर देण्याची अट : आमदार अपात्रता प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
पेडणेचे आमदार मनोहर उर्फ बाबू आजगावकर आणि सावर्डेचे आमदार दीपक पाऊस्कर यांना अपात्र का केले जाऊ नये, असा प्रश्न करून मुंबई उच्च न्यायालयाने या दोघा मंत्र्यांना व सभापती राजेश पाटणेकर यांना नोटीस बजावली आहे. दि. 22 ऑक्टोबर 2021 पूर्वी उत्तर देण्याची अट घातली असून या दिवशी याचिका अंतिम निकालात काढली जाणार असल्याचे न्यायपीठाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वतीने रामकृष्ण उर्फ सुदिन माधव ढवळीकर यांनी सादर केलेली याचिका न्यायमूर्ती मनीष पटेल आणि न्या. एम. एस. जवळकर यांच्या न्यायपीठासमोर काल शुक्रवार दि. 24 सप्टेंबर रोजी सुनावणीस आली तेव्हा याचिकादाराच्या वतीने ऍड. सी. ए. फरेरा व ऍड. धवल जवेरी यांनी बाजू मांडली.
सरकारच्या वतीने ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम आणि ऍड. परिक्षित सावंत हजर होते. त्यांनी सभापतींच्या वतीने नोटीस स्वीकारली. प्रतिवादी बाबू आजगावकर आणि दीपक पाऊस्कर यांनी 22 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष किंवा वकिलांमार्फत न्यायालयात हजर रहावे व त्यापूर्वी त्यांनी याचिकेवर उत्तर द्यावे, असे न्यायपीठाने स्पष्ट केले आहे.
सदर नोटीस याचिकादाराने हमदस्त पद्धतीने लवकरात लवकर या दोघा मंत्र्यांपर्यंत पोचवण्यास न्यायालयाने मान्यता दिली. तसेच पुढील सुनावणीच्यावेळी याचिका अंतिम सुनावणीसाठी असेल, हेही स्पष्ट केले. पुढील सुनावणी दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी ठेवण्यात आली आहे.