हवामानाप्रकरणी योजना : भारताहून दीडपट अधिक भागात मोहीम
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीन आता हवामानालाही तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. याकरता त्याने 2025 पर्यंत एक कार्यक्रम आखला आहे. त्याने या कार्यक्रमाची कक्षा 50.5 लाख चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्याची योजना आखली आहे. हा आकार भारताच्या क्षेत्रफळाच्या दीडपट अधिक आहे.
हिमवृष्टी आणि पाऊस यासारख्या हवामानविषयक बदलांवर नियंत्रण मिळविता येणार असल्याचे चीनकडून सांगण्यात आले. चीनने या प्रयत्नाला एक्सपेरिमेंटल वेदर मोडिफिकेशन प्रोग्राम नाव दिले आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तींपासून दिलासा मिळेल आणि कृषी उत्पादन वाढविण्यास मदत होणार असल्याचा चीनचा दावा आहे. अधिक तापमान असलेल्या भागात तापमान कमी करणे, दुष्काळग्रस्त क्षेत्रांमध्ये पाऊस पाडविण्याचा प्रयत्न होईल. अधिक पाऊस आणि हिमवृष्टीला नियंत्रित करण्यासाठीही काम केले जाणार आहे. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकवेळी चीनने पाऊस रोखणे आणि आकाश निरभ्र ठेवण्यासाठी त्याने क्लाउड सीडिंगची मदत घेतली होती.
9 हजार कोटींचा खर्च
चीनने हवामानावर नियंत्रण मिळविण्याच्या स्वतःच्या कार्यक्रमावर मोठी गुंतवणूक केली आहे. 2012 ते 2017 दरम्यान या कार्यक्रमाकरता 1.34 अब्ज डॉलर्स (9889 कोटी रुपये) खर्च केले आहेत. या कार्यक्रमाद्वारे चीनच्या जिनजियांग प्रांतात गारपिटीमुळे होणारे नुकसान 70 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत मिळाल्याचा दावा आहे. हा प्रांत चीनमध्ये शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.