वृत्तसंस्था/ ट्रेंटब्रीज
शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकने यजमान इंग्लंडचा 31 धावांनी पराभव करून मालिकेत विजयी सलामी दिली. या सामन्यात इंग्लंडच्या लिव्हींगस्टोनचे 42 चेंडूतील जलद शतक वाया गेले. पाकतर्फे कर्णधार बाबर आझम आणि उपकर्णधार मोहम्मद रिझवान यांनी 15 षटकांत सलामीच्या गडय़ासाठी 150 धावांची दमदार भागीदारी केली. पाक संघाला इंग्लंडच्या दौऱयात वनडे मालिकेत दारूण हार पत्करावी लागल्यानंतर त्यांनी टी-20 मालिकेत मुसंडी मारत पहिला विजय नोंदविला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 20 षटकांत 6 बाद 232 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 201 धावांत आटोपला. पाकच्या डावामध्ये कर्णधार बाबर आझम आणि उपकर्णधार रिझवान यांनी 15 षटकांत 150 धावांची भागिदारी केली. बाबर आझमने 49 चेंडूत 85 तर रिझवानने 41 चेंडूत 63 धावा जमविल्या. फक्र झमानने 8 चेंडूत 26 तसेच मोहम्मद हाफीजने 10 चेंडूत 24 धावा फटकाविल्या.
झमन आणि हाफीज यांनी केवळ 16 चेंडूत 46 धावांची भागीदारी केली. टी-20 प्रकारातील पाकचीही सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडतर्फे टॉम करेनने 47 धावांत 2 गडी गडी बाद केले. या सामन्यात कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली होती. पाकच्या डावात 12 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव 201 धावांत आटोपला. इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हींगस्टोनने टी-20 प्रकारात इंग्लंडतर्फे सर्वात जलद शतक झळकविले. लिव्हींगस्टोनने 42 चेंडूत आपले शतक पूर्ण केले याने आपले अर्धशतक केवळ 17 चेंडूत पूर्ण केले. लिव्हींगस्टोनने नववा षटकार आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यानंतर तो पुढील चेंडूवर झेलबाद झाला. पाकच्या शाहीन आफ्रिदीने त्याचा सीमारेषेवर झेल टिपला. त्यावेळी इंग्लंडची स्थिती 17 षटकाअखेर 7 बाद 183 अशी होती.
इंग्लंडच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्या 7 षटकांत इंग्लंडने 4 गडी गमविले होते. पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 30 धावांत 3 गडी बाद केले. आफ्रिदीने सलामीच्या मॅलेनला झेलबाद केले. त्यानंतर त्याने बेअरस्टोचा बळी मिळविला. पहिल्या चार षटकांत इंग्लंडने दोन गडी गमविले होते. हॅरीस रॉफने इंग्लंडच्या मोईन अलीचा अप्रतिम झेल टिपला. जेसन रॉयने 32 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
पाक 20 षटकांत 6 बाद 232 (बाबर आझम 85, रिझवान 63, फक्र झमान 26, मोहम्मद हाफीज 24, टॉम करेन 2-47), इंग्लंड – 20 षटकांत सर्वबाद 201 (लिव्हींगस्टोन 103, रॉय 32, शाहीन आफ्रिदी 3-30, शदाब खान 3-52).