वृत्तसंस्था/ लंडन
पाकमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक झपाटय़ाने होत असून प्रत्येक दिवशी सुमारे 2000 ते 3000 लोकांना याची बाधा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते पण मे अखेरनंतर जून महिन्याच्या मध्यंतरापर्यंत प्रत्येक दिवशी सुमारे 6800 लोकांना याची बाधा होत आहे. तथापि कोरोनाचे रूग्ण यापुढे अधिक झाले तरी पाक संघाचा नियोजित इंग्लंड दौरा थांबणार नाही, असे प्रतिपादन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे संचालक ऍश्ले जाईल्स यांनी केले आहे.
या दौऱयासाठी पाकच्या घोषित संघामध्ये हैदर अली, हॅरीस रौफ आणि शदाब खान या तीन सदस्यांची कोरोना चांचणी रविवारी घेण्यात आली, त्यावेळी या तीन क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. सध्याची स्थिती चिंताजनक असली तरी पाकचा हा नियोजित इंग्लंड दौरा ठरलेल्या वेळीच होईल. तसेच या दौऱयाबाबत सध्यातरी कोणताच संशय निर्माण होत नाही. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका ठरलेल्यावेळी खेळविण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला कोणतीच अडचण भासणार नाही, असेही जाईल्स यांनी म्हटले आहे.
पाकचा क्रिकेट संघ येत्या रविवारी इंग्लंडच्या दौऱयावर रवाना होत आहे. या दौऱयामध्ये तीन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. पाकच्या इंग्लंड दौऱयाला ऑगस्टमध्ये प्रारंभ होईल., असे जाईल्स यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून पाकमध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याचे चित्र दिसून येते. गेल्या दोन दिवसात पाकमध्ये कोरोनामुळे 105 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाकमध्ये जवळपास दोन लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली असून जुलै महिनाअखेर यामध्ये प्रचंड वाढ होईल, असा अंदाज पाक शासनाने वर्तविला आहे. इंग्लंडमध्ये कोरोना संदर्भातील प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. मास्कच्या वापरावर सक्ती करण्यात आली आहे. पाकचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर या संघाला काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल. इंग्लंडच्या दौऱयावर जाण्याचा पाकचा निर्णय मोठा धोकादायक असल्याचे मत पाक क्रिकेट मंडळाच्या वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ.सोहेल सलीम यांनी व्यक्त केले आहे.
विंडीजचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयावर आला असून उभय संघातील कसोटी मालिकेला 8 जुलैपासून प्रारंभ होईल. विंडीज संघाच्या 14 दिवसांच्या आयसोलेशन कालावधी सोमवारी पूर्ण झाला आहे. इंग्लंड संघाने मंगळवारी काही वेळ क्रिकेटचा सराव केला.