कर्णधार बाबर आझमचा टी-20 प्रकारात नवा विक्रम
वृत्तसंस्था/ हरारे
झिंबाब्वेच्या दौऱयावर गेलेल्या पाक क्रिकेट संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात पाकने झिंबाब्वेचा 24 धावांनी पराभव केला. पाकच्या मोहम्मद रिझवानला ‘मालिकावीर’ तर 4 बळी टिपणाऱया हसन अलीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. पाकचा कर्णधार बाबर आझमने टी-20 प्रकारात सर्वात जलद 2000 धावांचा टप्पा गाठताना भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला.
या शेवटच्या सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 बाद 165 धावा जमविल्या. त्यानंतर झिंबाब्वेने 20 षटकांत 7 बाद 141 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना सामना आणि मालिका गमवावी लागली.
पाकच्या डावामध्ये सलामीच्या मोहम्मद रिझवानने 60 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 91, शार्जिल खानने 15 चेंडूत 3 चौकारांसह 18, कर्णधार बाबर आझमने 46 चेंडूत 5 चौकारांसह 52 धावा जमविल्या. फक्र झमानला खाते उघडता आले नाही. पाकच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे जाँग्वेने 37 धावांत 3 गडी बाद केले.
झिंबाब्वेच्या डावामध्ये सलामीच्या मधवेरेने 47 चेंडूत 5 चौकारांसह 59, टी.मुसाकेंदाने 1 चौकारांसह 10, मेरूमनीने 26 चेंडूत 4 चौकारांसह 35, ब्रेंडॉन टेलरने 22 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. कर्णधार विलीयम्सने 1 चौकारांसह 9 आणि जाँग्वेने 1 चौकारांसह 5 धावा केल्या. झिंबाब्वेच्या डावात 16 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे हसन अलीने 18 धावांत 4, रॉफने 34 धावांत 2 तर हेसनेनने 26 धावांत 1 गडी बाद पेला.
बाबर आझमचा विक्रम
पाकचा कर्णधार बाबर आझमने रविवारी येथे झालेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात नवा विक्रम करताना 2000 धावांचा टप्पा गाठला. टी-20 प्रकारात बाबर आझम 52 डावामध्ये 2000 धावांचा टप्पा गाठणारा सर्वात जलद फलंदाज आहे. यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नांवावर हा विक्रम नोंदविला गेला होता. कोहलीने 56 डावात 2000 धावांचा टप्पा गाठला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने 62 डावात तर न्यूझीलंडच्या ब्रेंडान मेकॉलमने 66 डावात 2000 धावांचा टप्पा गाठत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळविले आहे. टी-20 प्रकारात सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांच्या यादीत बाबर आझमने 2035 धावांसह 11 वे स्थान मिळविले आहे. कोहलीने 52.65 धावांच्या सरासरीने 3159 धावा जमविल्या आहेत. आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत कोहली पाचव्या स्थानावर असून बाबर आझमने दुसरे स्थान मिळविले आहे. मात्र आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या मानांकनात गेल्या आठवडय़ात कोहलीने अग्रस्थान राखले होते.
संक्षिप्त धावफलक-पाक 20 षटकांत 3 बाद 165 (मोहम्मद रिझवान नाबाद 91, शार्जिल खान 18, बाबर आझम 52, जाँग्वे 3-37), झिंबाब्वे 20 षटकांत 7 बाद 141 (मधवेरे 59, टी. मुसाकेंदा 10, मेरूमनी 35, टेलर 20, हसन अली 4-18, रॉफ 2-34,हेसनेन 1-26).