नौमन अलीचे 5, यासिरचे 4 बळी, फवाद सामनावीर
वृत्तसंस्था/ कराची
पदार्पणवीर डावखुरा स्पिनर नौमन अली व यासिर शहा यांच्या भेदक फिरकी माऱयापुढे द.आफ्रिकेचा दुसरा डाव झटपट गुंडाळल्यानंतर पाकने विजयाचे उद्दिष्ट केवळ 3 गडय़ांच्या मोबदल्यात गाठत येथे झालेली पहिली कसोटी सात गडय़ांनी जिंकली. दोन सामन्यांच्या मालिकेत पाकने 1-0 अशी आघाडी घेत कसोटी चॅम्पियनशिपसाठी 60 गुणही मिळविले. पाकचा शतकवीर फवाद आलमला सामनावीराचा बहुमान मिळाला.
34 वर्षीय नौमन अलीने पदार्पणाच्या सामन्यात पाच बळी मिळविल्याने द.आफ्रिकेचा दुसरा डाव 245 धावांतच आटोपला आणि पाकला विजयासाठी 88 धावांचे किरकोळ आव्हान मिळाले. मात्र या धावांसाठीही पाकला थोडा संघर्ष करावा लागला. ऍन्रिच नॉर्त्जेने एकाच षटकात दोन बळी मिळविले. पण कर्णधार बाबर आझम (30) व अझहर अली (नाबाद 31) यांनी आणखी पडझड होऊ न देता 3 बाद 90 धावा जमवित विजय साकार केला. या सामन्यात दोन्ही संघांकडे पारडे झुकत असल्याचे दिसून आले. मात्र तिसऱया दिवशी दक्षिण आफ्रिकेची मधली फळी गडगडल्यानंतर सामना पाकच्या बाजूने झुकला. दुसरा व शेवटचा सामना येत्या गुरुवारपासून रावळपिंडीमध्ये सुरू होणार आहे. या दौऱयात द.आफ्रिका संघ तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे.
दुसऱया डावात द.आफ्रिका 1 बाद 175 असे भक्कम स्थितीत होते. नौमन व यासिर शहा यांनी मार्करम (74) व रासी व्हान डर डय़ुसेन (64) यांच्यासह तीन बडय़ा खेळाडूंना बाद केल्यानंतर लवकरच त्यांची स्थिती 6 बाद 192 अशी झाली. चौथ्या दिवशीही ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. त्यांच्या शेवटच्या 9 फलंदाजांनी केवळ 70 धावांची भर घातली. त्यांची फिरकीसमोर उडणारी तारांबळ पुन्हा एकदा उघड झाली. पाकमधील खेळपट्टय़ा भारत व लंकेच्या तुलनेत फिरकीला मोठय़ा प्रमाणात साथ देत नाहीत. पण नौमन व यासिर या दोघांनी मिळून 114 धावांत 9 बळी मिळवित द.आफ्रिकेला अखेरपर्यंत सावरू दिले नाही. कर्णधार क्विन्टॉन डी कॉक 2 धावांवर बाद झाल्याने त्याचा फॉर्म हा पाहुण्या संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या चार डावांत त्याला केवळ 45 धावा जमविता आल्या आहेत. द.आफ्रिकेचा पहिला डाव 220 धावांत संपुष्टात आल्यानंतर पाकची स्थितीही 4 बाद 27 अशी बिकट बनली होती. पण फवाद आलमने नेंदवलेल्या शतकामुळे पाकने 378 धावांची मजल मारत पहिल्या डावात 158 धावांची आघाडी मिळविली. हीच आघाडी त्यांना विजय मिळवून देण्यासाठी मोलाची ठरली. संक्षिप्त धावफलक ः द.आफ्रिका प.डाव 220, पाक प.डाव 378, द.आफ्रिका दु.डाव 100.3 षटकांत सर्व बाद 245 ः मार्करम 74, व्हान डर डय़ुसेन 64, डीन एल्गार 29, डु प्लेसिस 10, केशव महाराज 2, डी कॉक 2, टेम्बा बवुमा 40, जॉर्ज लिन्डे 11, रबाडा 1, नॉर्त्जे 0, एन्गिडी नाबाद 3, अवांतर 9. गोलंदाजी ः नौमन अली 5-35, यासिर शहा 4-79, हसन अली 1-61, शाहीन आफ्रिदी 0-61, फहीम अश्रफ 0-8. पाक दु.डाव 22.5 षटकांत 3 बाद 90 ः इम्रान बट 12, अबिद अली 10, अझहर अली नाबाद 31, बाबर आझम 30, फवाद आलम नाबाद 4, अवांतर 3. गोलंदाजी ः नॉर्त्जे 2-24, केशम महाराज 1-12, रबाडा 0-21, एन्गिडी 0-17, लिन्डे 0-13.