वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
यजमान विंडीज आणि पाक यांच्यातील सबिना पार्क मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजविला. दिवसभरात एकूण 12 गडी बाद झाले. विंडीजने पाकला पहिल्या डावात 217 धावांत रोखले. त्यानंतर पाकच्या मोहम्मद अब्बासने विंडीजचे 2 गडी बाद करून सामन्यात रंगत आणली.
या कसोटीत विंडीजने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या भेदक माऱयासमोर पाकचा पहिला डाव 70.3 षटकात 217 धावांत आटोपला. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने काही मिनिटांचा खेळ वाया गेला. पाक संघातर्फे फवाद आलमने 117 चेंडूत 6 चौकारांसह 56, फईम अश्रफने 66 चेंडूत 8 चौकारांसह 44, कर्णधार बाबर आझमने 64 चेंडूत 4 चौकारांसह 30, मोहम्मद रिझवानने 30 चेंडूत 5 चौकारांसह 23, अझहर अलीने 1 चौकारासह 17, इम्रान बटने 1 चौकारासह 11 तर हासन अलीने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. पाकचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. विंडीजतर्फे केमर रॉचने 47 धावांत 2, सिलेसने 70 धावांत 3, जेसन होल्डरने 26 धावांत 3 तर मेयर्सने 28 धावांत 1 गडी बाद केला.
विंडीजच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पाकच्या मोहम्मद अब्बासने आपल्या एका षटकातील सलग दोन चेंडूवर विंडीजचे दोन फलंदाज बाद केल्याने विंडीजवर थोडे दडपण आले आहे. मोहम्मद अब्बासने विंडीजच्या डावातील तिसऱया षटकात किरेन पॉवेलला खाते उघडण्यापूर्वी इम्रान बटकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानतंर मोहम्मद अब्बासने पुढील चेंडूवर बोनेरला पायचीत केले. विंडीजची स्थिती यावेळी 2 बाद 1 अशी होती. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी विंडीजने पहिल्या डावात 4 षटकात 2 बाद 2 धावा जमविल्या. पाकतर्फे मोहम्मद अब्बासने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव- 70.3 षटकात सर्वबाद 217 (फवाद आलम 56, फईम अश्रफ 44, बाबर आझम 30, मोहम्मद रिझवान 23, अझहर अली 17, हसन अली 14, इम्रान बट 11, रॉच 2-47, सिलेस 3-70, होल्डर 3-26, मेयर्स 1-28), विंडीज प. डाव- 4 षटकात 2 बाद 2 (ब्रेथवेट खेळत आहे 1, पॉवेल 0, बोनेर 0, चेस खेळत आहे 0, मोहम्मद अब्बास 2 बळी).