वृत्तससंस्था/ लाहोर
यजमान पाकिस्तानने शनिवारी येथे बांगलादेश विरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. शनिवारी झालेल्या या मालिकेतील दुसऱया सामन्यात पाकने बांगलादेशला 9 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात पाकच्या बाबर आझमला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या दुसऱया सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 136 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 16.4 षटकांत 1 बाद 137 धावा जमवित विजय मिळविला.
बांगलादेशच्या डावात सलामीच्या तमीम इक्बालने 53 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 65, ए हुसेनने 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 21, कर्णधार मेहमूदुल्लाने 1 चौकारांसह 12 धावा जमविल्या. मेहदी हसनने 1 षटकारासह 9, दासने 1 चौकारांसह 8 तसेच अमिनूल इस्लाम 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे मोहम्मद हेसनानने 20 धावांत 2 तसेच अफ्रिदी, रॉफ आणि शदाब खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकने 16.4 षटकांत 1 बाद 137 धावा जमविल्या. कर्णधार बाबर आझमने 44 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 66 तर मोहम्मद हाफीजने 49 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 67 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 131 धावांची भगिदारी केली. सलामीचा एहसान अली खाते उघडण्यापूर्वी तंबूत परतला. ताकच्या डावात 2 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशच्या एस इस्लामने 27 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश – 20 षटकांत 6 बाद 136 (तमीम इक्बाल 65, ए. हुसेन 21, मेहमूदुल्ला 12, मोहम्मद हेसनेन 2-20, अफ्रिदी, रॉफ, शदाब खान प्रत्येकी 1 बळी). पाक- 16.4 षटकात 1 बाद 137 (बाबर आझम नाबाद 66, मोहमद हाफीज नाबाद 67, एस इस्लाम 1-27).