ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या खालिद बटली उर्फ मोहम्मद खुरासानी याचा अफगाणिस्तानात खात्मा करण्यात आला. पाकिस्तानच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या असलेला खुरासानी हा खैबर पख्तुनख्वाच्या मिरामशाह शहरात एक दहशतवादी अड्डा चालवत होता. मात्र, ऑपरेशन ‘जरब-ए-अजाब’नंतर तो अफगाणिस्तानात पळून गेला होता. तो टीटीपीचा प्रवक्ताही होता. पाकिस्तानी नागरिक आणि सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये खुरासानी सक्रीयरित्या सहभागी होता. अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता काबीज केल्यानंतर त्याचे अनेक काबूल दौरे झाले आहेत.
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यासाठी त्याने केला होता. दरम्यान, नुकताच अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात मोहम्मद खुरासानीचा शेवट झाल्याचं पाकिस्तानच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, खुरासानीचा मृत्यू कसा झाला याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.