ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेलगत रात्री 12 च्या सुमारास पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकण्यात आल्याचा संशय बीएसएफच्या जवानांना आला. त्यानंतर बीएसएफ जवानांनी या ड्रोनवर गोळीबार केल्याने ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने निघून गेला. या घटनेनंतर परिसरात शोधमोहिम सुरू असताना दोन ठिकाणी स्फोटकं आढळून आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बीएसएफच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये 73 बटालियनच्या जवानांना पंजाबमधील पंजग्राहियन सीमा चौकीवर ड्रोन दिसले. ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काहीतरी फेकल्याचा बीएसएफ जवानांना संशय आला. त्यानंतर सतर्क जवानांनी सीमेवरून उडणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार केला. त्यामुळे हा ड्रोन पुन्हा पाकिस्तानकडे निघून गेला. दरम्यान, या भागात शोधमोहिम राबविण्यात आली असता दोन ठिकाणी स्फोटकं सापडली.