वृत्तसंस्था / कराची
पाकचा माजी क्रिकेटपटू आणि सलामीचा फलंदाज तौफिक उमरला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. सदर माहिती तौफिक उमरने स्वत: वृत्तसंस्थेला दिली आहे.
अलिकडच्या कालावधीत कोरोनाची लागण झालेल्या क्रिकेटपटूंमध्ये 38 वर्षीय तौफिक उमर हा चौथा क्रिकेटपटू आहे. स्कॉटलंडचा मजीद हक, पाकचा झफर सर्फराज आणि दक्षिण आफ्रिकेचा सोलो निक्वेनी यांना कोरोनाची लागण झाली होती. तौफिक उमरला शनिवारी रात्रीपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्याने लागलीच वैद्यकीय तपासणी करून घेतली. या तपासणीमध्ये त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लवकरच मी या व्याधीतून पूर्ण बरा होईन, असा विश्वास तौफिक उमरने व्यक्त केला आहे. तौफिक उमरने 44 कसोटी आणि 12 वनडे सामन्यात अनुक्रमे 2963 आणि 504 धावा जमविल्या आहेत. दुबईमध्ये 2014 साली न्यूझीलंडविरूद्ध त्याने आपल्या शेवटच्या सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले होते.