भारतीय सैन्याच्या मोहिमेमुळे दहशतवाद्यांचे कट अयशस्वी : पाकिस्तानकडून 4700 वेळा गोळीबार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2020 या वर्षात केवळ कोरोना महामारीचा कहरच राहिला नसून पाकिस्ताननेही आगळीकींचा उच्चांक केला आहे. पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनाचा स्वतःचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. 2020 या वर्षात मागील 17 वर्षांमध्ये सर्वाधिक प्रमाणात शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानने छोटय़ा शस्त्रांसह मोठय़ा शस्त्रास्त्रांचा वापर करत सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले आहे. परंतु भारतीय सैन्यानेही यंदा दहशतवाद्यांवर प्रचंड प्रहार केला आहे. यंदा एकूण 221 दहशतवादी मारले गेले आहेत.
2003 साली पाकिस्तान आणि भारत यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी झाली होती. 2004, 2005 मध्ये शस्त्रसंधीचा भंग झाला नव्हता. परंतु त्यानंतर हळूहळू पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राहिला आहे. 2006 साली पाकिस्तानने 3 वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले होते. तर 2007 मध्ये हा आकडा 21 वर पोहोचला होता. 2019 मध्ये पाकिस्तानने 3168 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. तर यंदा सर्व विक्रम मोडून पाकिस्तानने 4700 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. चालू महिन्यात पाकिस्तानकडून 423 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकच्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईत शेजारी देशाचे मोठे नुकसान झाले आहे.
यंदा 221 दहशतवादी यमसदनी
पाककडून दहशतवाद्यांची घुसखोरी करविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. भारतीय सैन्याने यंदा 221 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यात काश्मीर खोऱयात सक्रीय दहशतवाद्यांसह प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडू पाहणाऱया घुसखोरांचाही समावेश आहे. मागील वर्षी 153 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर 2018 मध्ये हा आकडा 215, 2017 मध्ये 213 राहिला होता. जम्मू-काश्मीरच्या तरुणांना चिथावणी देण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून सुरू आहे. यंदा 166 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला आहे. परंतु यातील 45 ते 50 टक्के नवे दहशतवादी मारले गेले आहेत. तर 16 जणांना पकडण्यात आले असून 5 दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. दक्षिण काश्मीरमधून सर्वाधिक प्रमाणात तरुण दहशतवादात सामील झाले आहेत.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग
वर्ष | शस्त्रसंधी भंगाचे प्रमाण |
---|---|
2006 | 03 |
2007 | 21 |
2008 | 77 |
2009 | 28 |
2010 | 44 |
2011 | 62 |
2012 | 114 |
2013 | 347 |
2014 | 583 |
2015 | 405 |
2016 | 449 |
2017 | 971 |
2018 | 1629 |
2019 | 3168 |
2020 | 4700 |