ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरणाला वेग आला आहे. मात्र, कर्जबाजारी पाकिस्तान लस खरेदीसाठी पैसे नसल्याने चीनसारख्या भागीदार देशांकडून मोफत मिळणाऱ्या लसीवर अवलंबून आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे सचिव अशरफ ख्वाजा यांनी पब्लिक अकाउंट कमिटीच्या ब्रिफिंगदरम्यान यासंदर्भात माहिती दिली.
पाक सरकारने देशातील किमान 70 टक्के लोकांना मोफत लस देण्याची योजना आखली आहे. मात्र, हे लसीकरण आंतरराष्ट्रीय देणगीदार संस्था आणि चीनसारख्या भागीदार देशांकडून मोफत मिळणाऱ्या लसींमधून होणार आहे. पाकला यापूर्वीच चीनच्या सिनोफॉर्मकडून 5 लाख डोस मिळाले असून, अजून 5 लाख डोस मिळणार आहेत. ब्रिटनकडून 2 कोटी 80 लाख डोस मिळाले आहेत.
पाकिस्तानच्या औषध नियामक मंडळाने रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीच्या आपत्कालीन वापरासही परवानगी दिली आहे. मात्र, रशियाची ही लस पाकला कधीपर्यंत मिळणार याची माहिती अजूनही समोर आलेली नाही.