ऑनलाईन टीम/तरुण भारत
आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये वेगाने बदल होत असून त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील नागरी आणि आर्थिक समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करू लागल्या आहेत. विशेषत: पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजूनही स्वावलंबी होऊ शकलेली नसून त्याचाच परिणाम इतर क्षेत्रांवर होऊ लागला आहे. आणि हे खुद्द पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनीच मान्य केलं आहे. मोईद यूसूफ यांनी सोमवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना देशाच्या आर्थिक स्थितीविषयी गंभीर निरीक्षणं मांडली आहेत. तसेच, आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण देखील संकटात सापडल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.