वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानची अनुभवी महिला क्रिकेटपटू सना मीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 15 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता थांबवण्याची योग्य वेळ असल्याचे ट्विट करत सनाने निवृत्ती जाहीर केली.
34 वर्षीय सनाने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर अल्पावधीत पाक महिला संघात आपले विशेष स्थान निर्माण करणाऱया सनाने 2009 ते 2017 या कालावधीत संघाचे कर्णधारपदही भूषवले. सनाने 120 वनडे सामन्यात 151 बळी मिळवले असून टी-20 क्रिकेटमध्येही तिने चमकदार कामगिरी करताना 106 सामन्यात 89 बळी घेतले आहेत. याशिवाय, फलंदाजीतही तिने आपला ठसा उमटवला आहे. वनडे क्रिक्रेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी ती तिसरी खेळाडू आहे. वनडेत तिच्या खात्यावर 1630 धावा जमा आहेत. 15 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरीव योगदान दिल्यानंतर तिने शनिवारी निवृत्ती जाहीर केली. ‘पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणे, हे मी माझे भाग्य समजते. मला सहकार्य करणाऱया सर्वांचे आभार.’अशा शब्दांत तिने आपल्या भावना मांडल्या आहेत.