विरोधी पक्षांना इम्रान खानचा चकवा, 90 दिवसांमध्ये निवडणूक, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
@ इस्लामाबाद / वृत्तसंस्था
संसदेत बहुमत परीक्षेतील नामुष्की टाळण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदच विसर्जित करण्याची केलेली सूचना तेथील राष्ट्राध्यक्ष अरीफ अल्वी यांनी स्विकारली असून संसद विसर्जित करण्यात आली आहे. तसेच येत्या 90 दिवसांमध्ये तेथील संसदेची मध्यावधी निवडणूक होणार आहे. मात्र, या प्रकारची स्वतःहून दखल तेथील सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून लवकरच विशेष घटनापीठासमोर या घडामोडींसंबंधी सुनावणी केली जाणार आहे.
रविवारचा दिवस पाकिस्तानसाठी नाट्य़मय ठरला. इम्रान खान सरकारविरोधात तेथील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत मांडलेला अविश्वास प्रस्ताव रविवारी संसदेत चर्चेसाठी आणि मतदानासाठी येणार होता. त्यानुसार संसदेच्या विशेष अधिवेशनाचा प्रारंभ रविवारी सकाळी 11 वाजता झाला. विरोधी पक्षांच्या वतीने अविश्वास प्रस्ताव सादर झाला. तथापि, हा प्रस्ताव घटनाबाहय़ असल्याचे कारण दाखवत तो स्वीकारण्यास उपसभापती सुरी यांनी अनुमती नाकारली.
‘विदेशी हाता’चे कारण
आपले सरकार अस्थिर करण्यामागे विदेशी हात आहे, असा दावा करुन वातावरण निर्मिती करण्यास इम्रान खान यांनी गेल्या आठवड्य़ापासूनच प्रारंभ केला होता. त्यांनी हा हात अमेरिकेचा असल्याचेही सूचित केले होते. आपण शेवटच्या क्षणापर्यंत या हाताशी लढू अशी भाषाही त्यांनी केली होती. रविवारी अविश्वास प्रस्तावाच्या सादर झाल्यानंतर पाकिस्तानच्या कायदा मंत्र्यांनी इम्रान खान यांच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. हा अविश्वास प्रस्ताव विदेशी शक्तींच्या सांगण्यावरुन सादर झाला आहे. विदेशी शक्ती देशातील लोकनियुक्त सरकार पाडविण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. तो उपसभापतींनी त्वरित स्वीकारला आणि अविश्वास प्रस्ताव फेटाळला.
मतदानाआधीच निर्णय
विरोधी पक्षांच्या अविश्वास प्रस्ताव पाकिस्तानच्या घटनेच्या कलम 5 च्या विरोधात आहे. कोणतीही विरोधी शक्ती पाकिस्तानचे सरकार अस्थिर करत असेल तर तशा प्रयत्न हाणून पाडणे हे संसदेचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करत उपसभापती सुरी यांनी प्रस्तावावर चर्चा आणि मतदान न घेताच तो फेटाळला.
राष्ट्राध्यक्षांकडे सूचना
उपसभापतींनी अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्राध्यक्ष अरीफ अल्वी यांच्याकडे धाव घेतली आणि संसद विसर्जित करण्याची सूचना केली. राष्ट्राध्यक्षांनीही ती लगेच स्वीकारुन संसद विसर्जित केली.
विरोधी पक्ष संतप्त
इम्रान खान यांनी उपसभापतींना हाताशी धरुन अविश्वास प्रस्तावावर होऊ घातलेली पराभवाची नामुष्की टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी तो घटनेच्या विरोधात आहे. घटनेप्रमाणे विरोधी पक्षांना अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा अधिकार आहे. त्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान घेणे हे उपसभापती किंवा सभापती यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, सरकारची अब्रू वाचविण्याच्या नादात उपसभापतींकडून घटना पायदळी तुडविली गेली आहे, असा आरोप पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते शहाबाझ शरीफ यांनी केला. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो झरदारी यांनीही हा घटनेचा अवमान असल्याची टीका केली.
सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
पाकिस्तान संसदेतील या घटनांची गंभीर दखल तेथील सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार आहे. यासाठी विशेष घटनापीठाची नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षही सर्वोच्च न्यायालयात पोहचले असून त्यांनी याचिका सादर होणार आहे. अविश्वास प्रस्तावापासून पळ काढण्यासाठी सरकारने केलेली ही कृती घटनाबाहय़ असून ती अवैध ठरवावी आणि विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर रितसर मतदान होऊ द्यावे. मतदानात सरकारचा पराभव झाल्यास विरोधी पक्षांना सरकार स्थापनेची संधी द्यावी. त्यांना सरकारस्थापनेपासून वंचित ठेवणे हा घटनेचा अवमान आहे, असे विरोधी पक्षांकडून सादर केल्या जाणाऱया याचिकेत प्रतिपादन केले जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाकिस्तानातील राजकीय वातावरण तप्तच राहील.
लष्कराचा हात नाही
पाकिस्तानातील घडामोडींमध्ये लष्कराचा कोणताही हात नाही, असे विधान पाकिस्तान लष्करप्रमुख जावेद कमर बाजवा यांनी केले आहे. लष्कर यापासून अलिप्त आहे. आमचे काम देशाचे संरक्षण हे आहे. राजकारण करणे हे नाही. आम्ही या घडामोडी त्रयस्थपणे पाहत आहोत. कोणत्याही प्रक्रियेत आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असा दावा करतानाच त्यांनी भारताशी काश्मीरसह सर्व विषयांवर चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढला जाऊ शकतो, असेही प्रतिपादन केले. भारतासंबंधी त्यांनी प्रथमच सौम्य भूमिका घेतली असली तरी ती जशीच्या तशी स्विकारण्याची चूक भारताने करु नये, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
राजकीय अस्थिरतेचा घटनाक्रम…
खान यांना पंतप्रधानपद…
1996 ः इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ पक्षाची स्थापना
2002 ः इम्रान खान संसदीय निवडणूक जिंकून झाले प्रतिनिधी
2013 ः इम्रानखान यांचा पुन्हा व्यक्तिगत विजय, लोकप्रतिधित्व
2018 ः तेहरिक ए इन्साफ पक्षाला बहुमत, इम्रान खान पंतप्रधान
सध्याच्या घडामोडी…
3 मार्च 2021 ः विरोधी नेते युसुफ रझा गिलानी यांच्याकडून सिनेटच्या निवडणुकीत पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचा पराभव, अस्थिरतेचा प्रारंभ
6 मार्च 2021 ः इम्रान खान यांच्या सरकारने संसदेत विश्वास प्रस्ताव जिंकल्याने सरकारवरचे अस्थिरतेचे संकट काही काळापुरते झाले दूर
8 मार्च 2022 ः पाकिस्तानातील सर्व विरोधी पक्षांकडून एकत्रितरित्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर, काही सत्ताधारी बंडखोर
19 मार्च 2022 ः सत्ताधारी पक्षाच्या बंडखोर संसद सदस्यांना कारणे दाखवा नोटीस, त्यांना मतदानापासून दूर रहावे, यासाठी प्रयत्न
20 मार्च 2022 ः 25 मार्चला संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याचा निर्णय, अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदानाची घोषणा
23 मार्च 2022 ः 3 मित्रपक्षांची सरकारविरोधात मतदान करणार असल्याची घोषणा, राजीनामा न देण्याचा इम्रान खानचा निर्धार
25 मार्च 2022 ः पाकिस्तान संसदेच्या अधिवेशनास प्रारंभ, पण अविश्वास प्रस्ताव सादर न करुन घेताच अधिवेशन स्थगितीचा निर्णय
27 मार्च 2022 ः इस्लामाबाद येथील जनसभेत इम्रान खानकडून ‘विदेशी हात’ सरकारचा घात करत असल्याचा आरोप, अमेरिकेचा उल्लेख
28 मार्च 2022 ः पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षनेते शहबाझ शरीफ यांच्याकडून अविश्वास प्रस्ताव सादर, इम्रान खान सरकार अल्पमतात
31 मार्च 2022 ः पाकिस्तान संसदेचे अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अधिवेशन, मात्र पहिल्या दिवशी चर्चा, मतदान नाही
1 एप्रिल 2022 ः आपल्या जीवाला धोका असल्याचा इम्रान खानचा दावा. न घाबरता देशाच्या संरक्षासाठी लढत राहण्याची दिली जनतेला ग्वाही
3 एप्रिल 2022 ः संसदेचे उपसभापती कासीम सुरी यांचा अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्यास नकार, ‘विदेशी हाता’चे कारण पुढे करत नकार
3 एप्रिल 2022 ः इम्रान खान यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष अरीफ अल्वी यांना संसद विसर्जित करण्याचा प्रस्ताव, राष्ट्राध्यक्षांनी स्विकारला प्रस्ताव