नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
अफगाणिस्तानमध्ये ‘तालिबान राज’ आल्यामुळे पाकिस्तान खूप खुश असल्याचे दिसत आहे. कारण यादरम्यान आता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे विधान समोर आले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात इमरान खान तालिबानचे समर्थन करताना दिसत आहेत.
पाकिस्तानी टेलिव्हिजनवर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान इमरान खान तालिबानचे स्वागत करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये इमरान खान म्हणतात की, “गुलामगिरीच्या जोखडातून तालिबानची सुटका झाली. जेव्हा आपण दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करतो तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर येणं सोपं नसतं. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे. ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखं आहे.”, असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे.
दुसरीकडे, तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास चीन तयार असल्याचे म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, “चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो.”