पहिल्या टप्प्यात 20 खेळाडूंचा समावेश, पॉझिटिव्ह खेळाडूंना परवानगी नाही
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तान क्रिकेट संघाचे 20 सदस्यांचे पहिले पथक आज (दि. 28) इंग्लंडकडे रवाना होणार आहे. पहिल्या चाचणीत पॉझिटिव्ह ठरलेल्या 10 पैकी 6 खेळाडूंचे अहवाल पुन्हा निगेटिव्ह आले असून जे खेळाडू पॉझिटिव्ह आहेत, त्यांना दौऱयातून डच्चू देण्यात आला आहे. आज पहिल्या टप्प्यात 20 खेळाडू आणि सहायक पथकातील 11 सदस्य चार्टर्ड फ्लाईटने मँचेस्टरला रवाना होतील. या दौऱयात उभय संघ 3 कसोटी व 3 टी-20 सामने खेळणार आहेत.
मँचेस्टरमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तानी पथकाला वर्सेस्टरशायर येथे नेण्यात येईल. तेथे या पथकातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी होईल व त्यानंतर 14 दिवस ते विलगीकरण कक्षेत असतील. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते 13 जुलै रोजी डर्बिशायरकडे रवाना होतील.
पहिल्या टप्प्यात सोमवारी 18 खेळाडू व सहायक पथकातील 11 सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह होता, गुरुवारी पुन्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह कायम राहिला. या सर्व खेळाडूंना दौऱयावर जाण्याची परवानगी मिळाली. जलद गोलंदाज मुसा खान, पाकिस्तान युवा संघाचा कर्णधार-यष्टीरक्षक रोहेल नझीर व अन्य तीन राखीव खेळाडूंची गुरुवारी चाचणी घेण्यात आली, त्यात त्यांचे अहवालही निगेटिव्ह आले. क्लाईफ डिकॉन व वकार युनूस हे अनुक्रमे दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियातून थेट इंग्लंडमध्ये दाखल होतील. याशिवाय, शोएब मलिक दि. 24 जुलैच्या आसपास इंग्लंडमध्ये येण्याची शक्यता आहे.
चार राखीव खेळाडूंची बुधवारी चाचणी घेतली गेली, त्यात फक्त इम्रान बटचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बिलाल असिफ, मोहम्मद नवाज व मुसा खान यांचे अहवाल निगेटिव्ह आले. फखर झमन, मोहम्मद हस्नेन, मोहम्मद हाफीज, मोहम्मद रिझवान, शदाब खान, वहाब रियाज हे सर्व खेळाडू पुन्हा एकदा निगेटिव्ह ठरले आहेत. ज्या खेळाडूंचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यात हैदर अली, हॅरिस रौफ, कशिफ भट्टी, इमरान खान, मसाजर मलांग अली यांचा समावेश आहे.
आज रवाना होणाऱया पाकिस्तानी पथकातील खेळाडt : अझहर अली (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), अबिद अली, असद शफीक, फहीम अश्रफ, फवाद आलम, इफ्तिकार अहमद, इमाद वासिम, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मुसा खान, नसीम शाह, रोहेल नझीर, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शिनवरी, यासीर शाह.
बॉक्स
इंग्लंड-पाकिस्तान मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / ठिकाण
30 जुलै ते 3 ऑगस्ट / पहिली कसोटी / लॉर्डस
7 ते 11 ऑगस्ट / दुसरी कसोटी / मँचेस्टर
20 ते 24 ऑगस्ट / तिसरी कसोटी / नॉटिंगहम
29 ऑगस्ट / पहिली टी-20 / लीडस्
31 ऑगस्ट / दुसरी टी-20 / कार्डिफ
2 सप्टेंबर / तिसरी टी-20 / साऊथम्प्टन