क्वालालंपूर
मित्र देश असलेल्या मलेशियाने पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. मलेशियातील अधिकाऱयांनी शुक्रवारी क्वालालंपूर विमानतळावर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे बोईंग 777 हे विमान जप्त केले. स्थानिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला जप्त करण्यात आले आहे. ‘पीआयए’ने 2015 मध्ये एक व्हिएतनाम कंपनीकडून बोईंग 777 सह दोन विमान भाडय़ाने घेतले होते. याचे पैसे न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मलेशियाने पाकिस्तानचे विमान जप्त करण्यापूर्वी विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. बोईंग 777 हे विमान कराचीहून मलेशियाला पोहोचले होते. मलेशियाने हे विमान जप्त केल्यामुळे विमानातील 18 जणांचा स्टाफही क्वालालंपूर येथे अडकला आहे. तसेच नियमानुसार त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे.