तरीही इंग्लंड दौरा होणारच! दोन्ही मंडळे तूर्तास मालिकेविषयी ठाम
कराची / वृत्तसंस्था
इंग्लंड दौऱयावर जाण्यासाठी निवडलेल्या 29 पैकी 10 पाकिस्तानी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर मंगळवारी क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली. मोहम्मद हाफीज व वहाब रियाझ या वरिष्ठ खेळाडूंचा यात प्रामुख्याने समावेश आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सोमवारी रात्री आपले 3 खेळाडू कोरोनाग्रस्त असल्याचे जाहीर केले होते. 24 तासाच्या आतच त्यात आणखी 7 खेळाडूंची भर पडली. अर्थात, या अस्मानी संकटानंतरही उभय संघातील मालिका पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणेच होईल, असे दोन्ही मंडळांनी म्हटले आहे.
मोहम्मद हाफीज व वहाब रियाझ यांच्याशिवाय मंगळवारी ज्या अन्य 5 खेळाडूंचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यात फकहर झमान, इम्रान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हस्नेन व मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे. याशिवाय, साहायक पथकातील सदस्य मसाजर मलांग अलीला देखील कोरोना झाल्याचे आढळून आले. त्यापूर्वी, शदाब खान, हैदर अली व हॅरिस रौफ हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी रात्रीच जाहीर केले गेले होते. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सर्व खेळाडूंमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिली आहे.
‘पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे वैद्यकीय पथक या सर्व खेळाडूंच्या पूर्ण संपर्कात आहे आणि या सर्व खेळाडूंना आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी घरी सक्तीने क्वारन्टाईन राहणे अपेक्षित आहे’, असे पीसीबीने पत्रकातून नमूद केले. सर्व खेळाडू व पदाधिकारी लाहोरमध्ये एकत्र येतील आणि दि. 25 जून रोजी त्यांची आणखी एक चाचणी घेतली जाईल. त्यानंतर पुढील दिवशी सुधारित संघ जाहीर केला जाईल. वास्तविक, ही चिंतेची बाब आहे. पण, अद्याप हातात बराच अवधी शिल्लक असल्याने गोंधळून जाण्याची गरज नाही, असे पीसीबीने येथे म्हटले आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडू व पथकाला पूर्ण विश्रांती दिली जाईल, याचाही त्यांनी उल्लेख केला.
पाकिस्तानी संघ दि. 28 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार होता. पण, त्यापूर्वीच पाकिस्तानी संघातील या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असल्याने मालिकेबाबत अर्थातच अनिश्चितता निर्माण झाली आहे. पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात ऑगस्टमध्ये होणाऱया मालिकेत 3 कसोटी व 3 टी-20 सामने होणार आहेत.
कोटस्
खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले, ही पाकिस्तानमधील नागरिकांसाठी देखील धोक्याची घंटा आहे. 10 तंदुरुस्त, युवा खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, याचा अर्थ कोणालाही त्याची बाधा होऊ शकते, हा धोका समजून घ्यावा.
-पीसीबीचे सीईओ वासिम खान