ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कुरेशी यांनीच ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
कुरेशी यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी दुपारी मला ताप आला. त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी स्वतःलाच क्वारंटाईन करून घेतले. त्यानंतर माझी कोरोना चाचणी करण्यात आली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, मी घरातच स्वतंत्र राहून उपचार घेत आहे. तसेच घरातूनच सर्व कामे करणार आहे. कृपया मी बरा होवो यासाठी देवाकडे प्रार्थना करा, असेही कुरेशी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत पाकिस्तान जगात 12 व्या स्थानावर आहे. पाकमध्ये आतापर्यंत 2 लाख 25 हजार 283 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4619 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 25 हजार 094 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, अद्याप 95 हजार 570 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2460 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.