ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानने फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या (FATF) सूचनांनुसार दहशतवादाविरुद्धचे तिसरे विधेयक संसदेत मंजूर केले आहे. ‘द म्युच्युअल लीगल असिस्टंन्स (क्रिमिनिल मॅटर) 2020’ असे या विधेयकाचे नाव आहे.
FATF ही संस्था आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्यावर लक्ष ठेवते. या संस्थेचे युरोपियन कमिशन आणि गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल या दोन प्रादेशिक संस्था आणि 39 सदस्य आहेत. या संस्थेने 2018 मध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी FATF ने पाकिस्तानला कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली होती. पाकिस्ताननेही या लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी धार्मिक पक्षांचा विरोध झुगारून विधेयक मंजूर केले.
हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता इतर देशांना पाकिस्तान गुन्हेगारांच्या माहितीची देवाणघेवाण करेल. तसेच दहशतवाद्यांना प्रवास बंदी, शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी, दहशतवाद्यांना दीर्घकालीन तुरुंगवास व जबर दंड ठोठावणे, तसेच त्यांची संपत्ती जप्त करण्याची तरतूद या विधेयकात आहे.