लाहोर –
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पंजाब प्रांतामधील सध्याच्या स्थितीत असणाऱया 11 एकरपेक्षा अधिकच्या जमिनीसंबंधी न्यायालयाने आदेश देत जवळपास 11.2 कोटी पाकिस्तानी रुपयामध्ये लिलाव केला असल्याची माहिती आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पीएमएल-एनचे मुख्य नेते नवाज शरीफ यांना सप्टेंबर 2020 मध्ये भ्रष्ट म्हणून घोषित केले होते. लाहोरजवळ 80 किलोमीटर दूरवरील फिरोजवतवान या ठिकाणच्या शरीफ यांच्या 11 एकरपेक्षा अधिकच्या जमिनीचा लिलाव करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने लाहोर आणि शेखूपूरा जिल्हाधिकाऱयांना शरीफ यांच्या स्थावर मालमत्तांच्या विक्रीचा आदेश जारी केला असून संबंधीची रक्कम 60 दिवसात जमा करण्यास सांगितले आहे. जमिनीच्या लिलावात चौधरी मोहम्मद बोथा यांची बोली अंतिम झाली आहे. न्यायालयाने केलेल्या खुल्या लिलावात बोथा यांनी सदरची जमीन लिलावात घेतली आहे. दरम्यान या लिलावाविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तीन अर्जदारांनी आव्हान दिले होते, पण ते फेटाळण्यात आले. यामध्ये लाहोरमध्ये एक मॉल आणि दोन शेतजमिनी आहेत. लाहोर व शेखूपूरा जिल्हाधिकाऱयांनी स्थावर मालमत्ता, जागा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करावा, असे न्यायालयाने सुनावले आहे.