ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा प्रांतात खोदकामावेळी सापडलेल्या बुद्धांच्या मूर्तीची तेथील कामगारांकडून विटंबना करण्यात आली. या कामगारांनी बुद्धांच्या मूर्तीचे तुकडे-तुकडे करून टाकले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन कामगारांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तुन्वा प्रांतातील तख्त बाही परिसरात एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात येत होते. त्यावेळी कामगारांना एक बुद्धांची मूर्ती सापडली. या कामगारांनी त्या मूर्तीची विटंबना करत तुकडे-तुकडे करून टाकले. त्यामुळे पाकिस्तानातील बौद्ध धर्मियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
खैबर पख्तुन्वा या प्रांताचे नाव पूर्वी गंधारा होते. त्याकाळी या भागात बुद्ध धर्मियांची मोठी संख्या होती. 2017 मध्ये या भागात जगातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्ती सापडल्या होत्या. कामगारांनी विटंबना केलेली ही बुद्धमुर्ती 1700 वर्ष जुनी होती असा दावा पाकिस्तानातील पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.