ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
भारत आणि अमेरिकेने चीनच्या ‘टिकटॉक’ या लोकप्रिय ॲपवर बंदी घातल्यानंतर आता पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही पाकिस्तानात ‘टिकटॉक’वर बंदी घालायची आहे. पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्री शिबली फराज यांनी एका मुलाखतीत याबाबतचा दावा केला आहे.
फराज यांनी म्हटले आहे की, भारत आणि अमेरिकेने टिकटॉकॲप देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारे तसेच यूजर्सना असुरक्षित असल्याचे कारण देत त्यावर बंदी घातली. मात्र, इम्रान खान वेगळ्याच कारणाने या ॲपवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.
पाकिस्तानात अश्लीलता वाढीस लागली आहे. बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने इम्रान खान सरकार चिंतेत आहे. त्यामुळे अश्लीलता पसरवणारा सोशल मीडिया, ॲप्स आणि साईट्सवर बंदी घालण्याचा विचार इम्रान खान करत आहेत, असे फराज यांनी म्हटले आहे.