देशात महामारी नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अजब दावा : जगभरात कोरोना संसर्गामुळे 3,20,448 जणांचा बळी
जगात कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत 49,10,710 जणांना झाली आहे. तर 19 लाख 19 हजार 151 जणांना कोरोना संसर्गावर मात केली आहे. जगातील एकूण बळींचा आकडा 3,20,448 वर पोहोचला आहे. पाकिस्तानात आता कोरोना महामारी नसल्याने सर्व निर्बंध हटविण्यात यावेत असा अजब आदेश तेथील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आरोग्य अधिकाऱयांचा आक्षेप नसल्यास मॉल उघडले जावेत. बाजारपेठांवरील बंदी हटविण्यात यावी. कोरोना संसर्ग रोखण्यास अधिक प्रमाणात रक्कम का खर्च होतेय अशी विचारणाही न्यायालयाने केली आहे. पाकिस्तानात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तेथे आतापर्यंत 42 हजार 915 रुग्ण सापडले असून 903 जणांचा मृत्यू झाला आहे.
वुहानमधील पाकिस्तानी परतले
पाकिस्तानच्या सरकारने वुहानमध्ये अडकून पडलेल्या स्वतःच्या विद्यार्थ्यांना अखेर मायदेशात परत आणले आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरवेजच्या विमानाने मंगळवारी सुमारे 200 विद्यार्थी इस्लामाबाद येथे पोहोचले. महामारीचा प्रारंभ चीनच्या वुहान शहरातूनच झाला होता. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येच विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांद्वारे वुहानमधून परत आणण्याचे आवाहन केले होते. परंतु महामारी फैलावण्यापासून रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती.
ब्राझील चौथ्या स्थानावर
ब्राझीलमध्ये दिवसभरात कोरोना संसर्गामुळे 735 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तर एक दिवसापूर्वी 485 जणांचा बळी गेला होता. देशातील एकूण बळींचा आकडा 16,853 झाला आहे. दिवसभरात 14,288 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांचे एकूण प्रमाण 2 लाख 55 हजार 368 झाले आहे. संसर्गाप्रकरणी ब्राझील हा देश अमेरिका, रशिया आणि स्पेननंतर चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये निर्बंध हटविण्यासाठी लोक रस्त्यांवर उतरले आहेत.
अमेरिकेत दिवसात 759 बळी
अमेरिकेत कोरोनामुळे 91,985 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात तेथे 759 बाधितांनी जीव गमावला आहे. परंतु तेथेही प्रतिदिन मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येत घट झाली आहे. एकूण बाधितांचा आकडा 15,50,539 झाला आहे. संसर्गापासून वाचण्यासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन आणि झिंग सप्लिमेंट घेत असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटना महामारीचा योग्यवेळी इशारा देण्यास अपयशी ठरल्यानेच अनेकांनी जीव गमावल्याचे उद्गार आरोग्यमंत्री एलेक्स अजार यांनी काढले आहेत.
फ्रान्स : शाळेत 70 नवे रुग्ण
फ्रान्समध्ये एक आठवडय़ापूर्वी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तेथील शाळांमध्ये आता 70 नवे बाधित सापडले आहेत. देशातील बाधितांचा कमी होणारा आकडा पाहता टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. स्थानिक न्यायालयाने 8 दिवसांत धार्मिक स्थळांवरील बंदी हटविण्याचा आदेश दिला आहे. फ्रान्समध्ये दिवसभरात 131 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1,79,927 जणांना बाधा झाली असून 28,239 जणांचा मृत्यू झाला आहे.
चीनच्या हुबेईत नवा रुग्ण
चीनच्या हुबेई प्रांतात एक नवा रुग्ण सापडला आहे. चाचणी अहवाल प्राप्त होण्यापूर्वी त्याच्यात संसर्गाची कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती. संसर्गाची दुसरी लाट समोर आल्यावर सरकारने 14 मेपासून वुहानमधील सर्व 1.1 कोटी रहिवाशांची चाचणी सुरू केली आहे. स्थानिक प्रशासनाने चाचणी प्रक्रियेला ‘10 दिवसांची लढाई’ नाव दिले आहे. तेथे आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. तर 3,800 जणांचा मृत्यू झाला आहे.
रशियात 2.99 लाख रुग्ण
रशियात आतापर्यंत 2,99,941 कोरोनाबाधित सापडले असून 2,837 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात मॉस्को शहरात सर्वाधिक संसर्ग दिसून येतोय. मॉस्कोमध्ये मागील 24 तासांत 71 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी मृतांचा आकडा 1,651 झाला आहे. रशियात आतापर्यंत 76,130 जणांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. रशियातील मृत्युदर जगात सर्वात कमी आहे.
दक्षिण सूदान : उपाध्यक्षांना लागण
दक्षिण सूदानचे उपाध्यक्ष रीक माशर आणि त्यांची पत्नी एजेलिना टेनी यांना कोरोनाची लागण झाली आहे. एजेलिना या देशाच्या संरक्षणमंत्री आहेत. कोरोना कृतिदलाच्या एका सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यांचा सुरक्षारक्षक तसेच अन्य कर्मचारीही बाधित आढळले आहेत. देशात 236 रुग्ण सापडले असून 4 बळी गेले आहेत.