कार्यवाहक पंतप्रधान म्हणून ज्येष्ठ नेत्याची नियुक्ती होणार, इम्रान खान आंदोलनाच्या पवित्र्यात
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
रविवारी नाटय़मयरित्या विरोधी पक्षांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव पाकिस्तान संसदेच्या उपसभापतींनी चर्चा आणि मतदानाविनाच नाकारल्यानंतर निर्माण झालेली अस्थिरता अद्यापही कायम आहे. अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी आपल्या सरकारचा राजीनामा सादर केला आणि संसद विसर्जित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार संसद विसर्जितही करण्यात आली होती.
रविवारीच तेथील सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन सुनावणी सुरु केली होती. ती सोमवारीही सुरु राहिली. आज काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती आज मंगळवारी दुपारी बारा पासून पुन्हा सुरु होणार आहे. इम्रान खानच्या संसद विसर्जनाच्या सूचनेच्या विरोधात तेथील विरोधी पक्षांनी याचिका सादर केल्या असून त्यांच्यावर विचार सुरु आहे. आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालय आदेश देईल अशी शक्यता आहे. इम्रान खान सध्या कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम पहात आहेत.
आंदोलन करणार
इम्रान खान यांनी कार्यवाहक पंतप्रधान म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांचे नाव सुचविले आहे. या नावावर विचार केला जात आहे. मात्र कार्यवाहक पंतप्रधानांची नियुक्ती होईपर्यंत वातावरण निर्मिती करण्यासाठी आता त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आपले सरकार अस्थिर करण्यामध्ये विदेशी हाताचा सहभाग आहे या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी सोमवारी केला.
रस्त्यावर उतरणार
पाकिस्तानचे सरकार अस्थिर करणाऱया ‘विदेशी हाता’विरोधात देशातील युवकांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन इम्रान खानने केले. ते स्वतः सोमवारी रात्रीपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी इस्लामाबाद येथे एका मोर्चाचे नेतृत्वही केले. देश कोणत्याही परकीय शक्तीच्या आधीन होणार नाही. विरोधी पक्षांनी विदेशी शक्तींशी संगनमत करुन आपले सरकार पाडविण्याचा प्रयत्न केला. तथापि, शेवटच्या क्षणी संसद विसर्जित करुन आपण त्यांची विकेट घेतली, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, त्यांचे हे उसने अवसान असल्याची टीका होत आहे.
पाकिस्तानमध्ये दोन तट
सध्या पाकिस्तानमध्ये इम्रान समर्थक आणि इम्रान विरोधक असे दोन तट सामाजिक पातळीवरही पडल्याचे दिसून येते. इम्रानखान यांचे सरकार कालावधी पूर्ण करण्याआधीच विसर्जित झाल्याने इम्रान समर्थक रस्त्यावर उतरुन आंदोलने करीत आहेत. मात्र एका मोठय़ा गटाचे म्हणणे अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ द्यावयास हवे होते, असे आहे. बहुमत परीक्षेत आपण यशस्वी होऊ शकत नाही, हे लक्षात येताच खान यांनी संसद विसर्जित करण्याची सूचना करुन घटनाबाहय़ वर्तन केले आहे. त्यांनी पळपुटेपणा केला आहे, असेही या गटाचे म्हणणे आहे.
डाव घोषित करण्याची कृती
इम्रान खान हे माजी क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांना आपल्या संघाचा ऑल आtट होणार आणि आपण मॅच जिंकू शकत नाही, याची खात्री पटल्यावर डावच घोषित करुन मानहानीपासून मुक्तता करुन घेतली, असे बोलले जात आहे. तथापि, यामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे, अशीही टीका होत आहे. आता सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार यावर इम्रानखान यांचे भवितव्य अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने संसद विसर्जित करण्याचा निर्णय घटनाबाहय़ ठरविल्यास त्यांना अविश्वास प्रस्तावावा समोरे जावे लागू शकते. त्यामुळे ही टांगती तलवार अद्यापही त्यांच्या सरकारच्या डोक्यावर आहे, असे तज्ञांचे मत आहे.