ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची पाकिस्तानात तिसरी लाट आली असून, पंजाब प्रांतातील 7 शहरात आजपासून (दि.15) कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. आपत्कालीन सेवा वगळता कोणालाही घराबाहेर न पडण्याचा इशारा पंजाब प्रांत सरकारने दिला आहे.
पंजाब प्रांत सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लाहोर, रावळपिंडी, सरगोधा, फैसलाबाद, मुलतान, गुजरानवाला आणि गुजरात ही शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. 2 आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. त्यानंतरची परिस्थिती पाहून पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
या लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्यावर बंदी असेल. सार्वजनिक, खासगी किंवा कोणत्याही ठिकाणी सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांवर संपूर्ण बंदी असेल. बँक्वेट हॉल, कम्युनिटी हॉल, मार्केट आणि हॉटेल्सही या काळात बंद राहतील.