ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या 3 लाखांवर गेली आहे. पाकमध्ये आतापर्यंत 3 लाख 371 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 88 हजार 206 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
पाकिस्तानमध्ये गुरुवारी 196 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पाकिस्तानात 5 हजार 795 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 535 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 6 हजार 370 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत पाकिस्तानचा जगात सतरावा क्रमांक लागतो. पाकिस्तानात आतापर्यंत 28 लाख 79 हजार 655 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 65 लाख 88 हजार 163 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात 45 लाख 62 हजार 414 तर ब्राझीलमध्ये ही संख्या 42 लाख 39 हजार 763 एवढी आहे.