इस्लामाबाद
पाकिस्तानातील जियो न्यूज या वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार अली इम्रान सैयद यांचे शुक्रवारी रात्री अपहरण करण्यात आले आहे. नवाज शरीफ यांची कन्या मरियम यांचे पती कॅप्टन सफदर यांना ज्या हॉटेलमधून बळजबरीने सैन्याने उचलून नेले होते, तेथील सीसीटीव्ही चित्रण समाजमाध्यमांवर अली यांनी प्रसारित केले होते.
अपहरण केल्याशिवाय चौकशी होऊ शकत नाही का असा प्रश्न उपस्थित करत वरिष्ठ पत्रकार नसीम जेहरा यांनी अली यांच्या त्वरित सुटकेची मागणी केली आहे.
अली शुक्रवारी संध्याकाळी घरगुती साहित्याच्या खरेदीसाठी बाहेर पडले होते. अनेक तास उलटल्यावरही ते न परतल्याने शोध सुरू केला. त्यांची कार आणि मोबाईल काही अंतरावर मिळाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अधिक माहिती मिळाली नसल्याचे अली यांच्या पत्नीने सांगितले आहे.
सैन्य अन् आयएसआयवर संशय
अली यांच्या अपहरणामागे पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा हात असल्याचा थेट संशय आहे. कराचीच्या एका हॉटेलमधील खोलीचा दरवाजा तोडून कॅप्टन सफदर यांना ताब्यात घेण्यात आले होते. नवाजकन्या मरियम यांनी या प्रकाराला अपहरण संबोधिले होते. सैन्याने याप्रकरणात स्वतःचा हात नसल्याचा आरोप फेटाळला होता. परंतु अली यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. अली यांच्या पत्रकारितेमुळे पाकिस्तानी सैन्याचा खोटारडेपणा जगासमोर उघड झाला होता.
जेन यांच्यानंतर अली
जुलै महिन्यात वक्त न्यूजचे वरिष्ठ पत्रकार मतीउल्लाह जेन यांचे अपहरण करण्यात आले होते. जेन यांच्याकडे सैन्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण माहिती असल्याचा दावा तेव्हा करण्यात आला होता. अपहृत जेन यांचा प्रचंड छळ केल्यावर त्यांना सोडून देण्यात आले होते. याप्रकरणी अनेक देशांनी आवाज उठविला होता.