बंदी घातल्याने लोकांकडून नाराजी : बिस्किटाच्या जाहिरातीला देश घाबरल्याची टिप्पणी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात सध्या एका बिस्किटाच्या जाहिरातीवरून वादंग निर्माण झाला आहे. ही जाहिरात 4 ऑक्टोबरपासून टीव्हीवर प्रसारित केली जात आहे. या जाहिरातीवर आता पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेट्री अथॉरिटीने (पेमरा) बंदी घातली आहे. या जाहिरातीत पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात दिसून येते. काही लोक बंदीच्या बाजूने आहेत तर काही जण याला विरोध करत आहेत. मेहविश या अभिनेत्रीचे काही दिवसांपूर्वी भारताचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमसोबत नाव जोडले गेले हेते.
4 ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसारित होऊ लागली आणि 24 तासांनी प्राधिकरणाने टीव्ही वाहिन्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री दाखविली जाऊ नये असे सांगण्यात आले. एक दिवसांनी कथितरित्या या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली.
मुजऱयासारखी
पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार अन्सार अब्बासी यांनी या जाहिरातीला मुजरा संबोधून बंदीची मागणी केली. ही जाहिरात पाक समुदायासाठी योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोक मात्र नाराज
सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका निदा किरमानी मात्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराज आहेत. प्राध्यापक मारले जात आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसल्याची स्थिती आहे. लैंगिक हिंसाचार आणि गुन्हय़ांचे प्रमाण टोकाला पोहोचले आहे. अशा स्थितीत लोक एका बिस्किटाच्या जाहिरातीवरून चिंतेत पडले आहेत. पाकिस्तान देखील अजब देश असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली आहे.