ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात कोरोना संक्रमणाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत काहीसे कमी आहे. या देशात संसर्गाचे आकडे कमी होण्याचे एक कारण म्हणजे येथे कोरोना चाचण्या फारच कमी प्रमाणात होत असून, लसीकरणाला वेग आल्याचे सांगण्यात येते.
3 फेब्रुवारीला येथे राष्ट्रीय स्तरावर कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यात आली. प्रत्येक देशाप्रमाणेच पाकिस्तानातही पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. पाक सरकारने किमान 70 टक्के लोकांना मोफत लस देण्याची योजना आखली आहे. पाकला चीनकडून 5 लाख तर ब्रिटनकडून 2 कोटी 80 लाख डोस मिळाले आहेत.
पाकिस्तानच्या औषध नियामक मंडळाने रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीच्या आपत्कालीन वापरासही परवानगी दिली आहे. या लसीला मान्यता देणारा पाकिस्तान हा 22 वा देश ठरला आहे. मात्र, रशियाची ही लस पाकला कधीपर्यंत मिळणार याची माहिती अजूनही समोर आलेली नाही.
दरम्यान, पाकिस्तानात आतापर्यंत कोरोनाचे 5 लाख 81 हजार 365 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 5 लाख 46 हजार 371 रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. 12 हजार 896 रुग्ण दगावले असून, 22 हजार 098 रुग्ण उपचार घेत आहेत.