लसीसाठी लाच देण्याची लोकांची तयारी – गरीब रांगेत, श्रीमंताना सहज उपलब्ध
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान सध्या कोरोना लसींच्या तुटवडय़ाला तोंड देत आहे. तेथे चीनची कंपनी सिनोफार्मा आणि रशिया स्वतःची लस पाठवत आहे. या लसी घेण्यासाठी कराची, लाहोरसह प्रत्येक शहरात मोठय़ा रांगा लागत आहेत. अनेक तास रांगेत राहून देखील लोकांना लस मिळत नसल्याची स्थिती आहे. लस मिळविण्यासाठी लोक लाच देण्यासही तयार आहेत.
चालू महिन्यात लसीकरता लाच घेतल्याप्रकरणी 18 आरोग्य कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. खासगी क्लीनिकमध्ये श्रीमंतांसाठी लसीची कुठलीच कमतरता नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पुरवठा कमी असल्याने लसीकरणाचा वेग मंद असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
लसींच्या तुटवडय़ामुळे पाकिस्तानातील मध्यमवर्गीय सर्वाधिक त्रस्त आहेत. खर्च करण्याची तयारी असूनही त्यांना लसीची प्रतीक्षा करावी लागत आहे. पैसे देऊन देखील लस मिळत नसल्याने इम्रान खान सरकारबद्दल संताप निर्माण झाला आहे.
स्पुतनिक आणि सिनोफार्मसह पाकिस्तानला लवकरच ऍस्ट्राजेनेका लसीचे 13 लाख डोस मिळणार आहेत. मे अखेरपर्यंत सिनोवॅक लसीचे 35 लाख अतिरिक्त डोस मिळतील असा दावा पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसैन यांनी केला आहे.
स्पुतनिकसह अन्य काही लसींच्या विक्रीस इम्रान सरकारने अनुमती दिली आहे. चीनच्या कॅनसिनो बायोलॉजिक्सची सिंग डोस लस 28 डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मागील महिन्यात याच्या विक्रीला अनुमती मिळाली आहे. पण स्पुतनिकवर अधिक भरवसा असल्याने त्याची मागणी अधिक आहे.