आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना आश्रय देणारे राष्ट्र म्हणून एव्हाना पाकिस्तान कुप्रसिद्ध बनले आहे. अमेरिका आणि भारत यांच्यानंतर चार दिवसांपूर्वी मंगळवारी इराणने पाकिस्तानच्या वायव्येकडील प्रांतात सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या दोन सैनिकांना मुक्त करून मायदेशी आणले. या कारवाईने पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे माहेरघर असल्याचे जागतिक मंचावर उघड झाले.
मंगळवार 2 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्री इराणच्या इलाईट रेव्होलुशनरी गार्डच्या साऊथ इस्ट कमांडने पाकिस्तानच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील जैश ऊल अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर छापे मारून आपल्या अपहरण केलेल्या दोन जवानांना घेऊन मायदेशात परतले. बुधवारी इराण इलाईट रेव्होलुशनरी गार्डच्या प्रवक्त्याने अधिकृतरित्या ही माहिती उघड केली. या दोन गार्डच्या जवानांचे 16 ऑक्टोबर 2018 रोजी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. दीड वर्षांपूर्वी झालेल्या या अपहरण नाटय़ात 12 जवानांना उचलून नेण्यात आले होते. या अपहरणाची जबाबदारी वहाबी विचारसरणीच्या जैश ऊल आदेल या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात वावरणाऱया संघटनेने स्वीकारली होती. इराणच्या या 12 जवानांपैकी पाचजणांना 15 नोव्हेंबर 2018 रोजी सोडून देण्यात आले होते. तर चारजणांना पाकिस्तानी लष्कराने 21 मार्च 2019 रोजी मुक्त केले होते. मध्यंतरी एका जवानाची मुक्तता करण्यात आली होती. दोन जवान अजून शिल्लक राहिले होते.
दोन जवानांची केली मुक्तता
अपहरण झालेल्या या दोन जवानांची मुक्तता करण्यास जैश ऊल अदल यांनी साफ नकार दिला होता. तसेच पाकिस्तानी लष्कराकडूनही त्यांना सोडविण्यात रुची नव्हती. पाकिस्तानी लष्कराने या दोन जवानांना सोडविण्यास असमर्थता दाखविल्यानंतर इराण इलाईट रेव्होलुशनरी गार्डच्या गुप्तचरांनी आपली वायव्य प्रांतातील मोहिम तीव्र केली. त्यांना गेल्या पंधरा दिवसांत पक्की आणि नेमकी माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानी भागात घुसण्याची तयारी सुरु केली. यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यावर विचार करण्यात आला. दुसऱया देशाच्या सीमा ओलांडण्यास लष्करी जवानांना शक्य नसल्याने अखेर वायूदलाच्या सहकार्यानेच सर्जिकल स्ट्राईल करण्याची योजना निश्चित करण्यात आली.
पाकिस्तानची चुप्पी
इराण इलाईट रेव्होलुशनरी गार्डच्या आग्नेय कमांडने आखलेली योजना मार्गी लावण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी रात्री जैश ऊल अदलच्या तळावर हवाई हल्ला चढविण्याचा बेत पक्का केला. गुप्तचरांच्या माहितीवरून पाकिस्तानी लष्कराचे काही अधिकारी जैशच्या दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचे समजल्याने त्यांचा बंदोबस्त केल्यानंतरच आपले काम फत्ते होईल याची खुणगाठ बांधली. त्याप्रमाणे मंगळवारी मध्यरात्री इराण इलाईट रेव्होलुशनरी गार्डच्या जवानांनी निर्णायक कारवाई सुरु करून पाकिस्तानच्या अतिदुर्गम भागात खोलवर असलेल्या जैश ऊल अदलच्या तळावर धडक मारली. तेथे असलेल्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱयांना कंठस्नान घातल्यानंतर त्यांनी तेथील जैश अदलच्या दहशतवाद्यांना ठार करून आपल्या अपह्रत सहकाऱयांची सुटका करून त्यांना घेऊन माघारी आपल्या तळावर पोहोचले. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात झालेल्या या घडामोडींची कोणतीही वाच्यता पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आली नाही. दुसऱया दिवशी इराण इलाईट रेव्होलुशनरी गार्डच्या प्रवक्त्याने इराणच्या सर्जिकल स्ट्राईकची माहिती देऊन दीड वर्षांपूर्वी अपहरण करून बंदीवासात ठेवलेल्या दोन जवानांना परत आणल्याची घोषणा केली.
जैश अदलचा वाढता उपद्रव
वहाबी पथाचे अनुसरण करणाऱया बलुचिस्तान प्रांतातील जैश ऊल अदलने आपला इराणमधील दबदबा कायम ठेवला आहे. इराणच्या बलुचिस्तान प्रांतातील बलुच सुन्नी नागरिकांवर इराणकडून अत्याचार होत असल्याचा आरोप ठेऊन या संघटनेने इराणमध्ये आपले दहशतवादी हल्ले तीव्र केले आहेत. या संघटनेकडून इराण इलाईट रेव्होलुशनरी गार्डच्या जवानांचे अपहरण करण्याचे प्रकार वाढविले आहेत. तसेच इराणमधील छोटय़ा मोठय़ा शहरांत बॉम्बस्फोट घडवून आणलेले आहेत. 2019 मध्ये याच संघटनेने बसीज या शहरातील इराणच्या निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला केला होता. तर गेल्या सहा वर्षांपासून अनेक अपहरणाचे प्रकार घडलेले आहेत. यात 2014 साली जाकीगोर येथून पाच इराण इलाईट रेव्होलुशनरी गार्डच्या जवानांचे अपहरण करण्यात आले होते. दोन महिन्यांनंतर त्यातील चार जणांना परत पाठविले, तर एकाची हत्या करून त्याचे शव इराणी अधिकाऱयांकडे सुपूर्द केले.
सौदी अरेबियाची फूस
जैश ऊल अदल ही वहाबी पंथाच्या सुन्नी मुसलमानांची संघटना असून या संघटनेला सौदी अरेबियाकडून अर्थसहाय्य मिळत आहे. वहाबी पंथाची विचारसरणी जगभरात पसरविण्यासाठी सौदी अरेबियाचे राजघराणे अब्जावधी डॉलर्स खर्च करीत असते. त्यात इराणबरोबर सौदी अरेबियाचे मोठे शत्रुत्व असल्याने इराणमध्ये वावरत असलेल्या जैश अदल संघटनेला पेट्रो डॉलर्सचा पुरवठा सातत्याने होत असतो. तर दुसऱया बाजूने पाकिस्तान हे सुन्नी राष्ट्र असल्याने शिया पंथीय इराणला शह देण्यासाठी या संघटनेला आपल्या भूमीवरुन वावरण्यास पूर्ण मोकळीक दिलेली आहे.
इराणने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झालेली आहे. अमेरिका, भारत आणि आता इराणच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान दहशतवाद्यांचे मुक्त कुरण झाल्याचे जगजाहीर झालेले आहे. त्यामुळे आता कोणताही देश दहशतवाद्यांना शोधण्यासाठी आता कोणत्याही फिकीरीविना बेधडक पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करून मोकळा होतो. दहशतवाद्यांशी संबंधीत मामला असल्याने त्याला हरकतही घेता येत नाही.
आतापर्यंत गैर इस्लामिक देशांनी पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केले होते. तर चार दिवसांपूर्वी एका इस्लामिक देशानेच तशी आगळीक केल्याने पाकिस्तानची पुरती फजिती झालेली आहे.
पी. कामत