इस्लामाबाद / वृत्तसंस्था
संसद विसर्जित करण्याच्या इम्रान खान यांच्या निर्णयाविरोधात तेथील सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारी सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती आज (गुरुवारी) होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संसदेत बहुमत परीक्षेच्या दिवशी घडलेल्या सर्व घडामोडींचा अहवाल मागविला आहे. तसेच लवकरात लवकर निर्णय होईल, असे आश्वासनही दिले आहे. या निर्णयावर इम्रान खान यांचे भवितव्य अवलंबून आहे.
आपल्याला सत्तेवरून हटविण्याचे कारस्थान विदेशी शक्तींनी रचलेले आहे, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे. यासाठी त्यांनी एक पत्रही सादर केले आहे. मात्र, त्या पत्राची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही. इम्रान खान यांनी या संदर्भात अमेरिकेचे नावही घेतले आहे. या विदेशी हाताच्या आरोपासंबंधीची माहितीही तेथील सर्वोच्च न्यायालयाने मागविली आहे.
90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या
पाकिस्तानात 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्यावी, असा आदेश तेथील राष्ट्राध्यक्षांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. मात्र, त्याआधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणे अपेक्षित आहे. तो निर्णय जसा लागेल, त्यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील, असे तेथील राजकीय तज्ञांचे मत आहे.