खैबर पख्तूनख्वामध्ये बसमध्ये स्फोट ः एकूण 10 जण ठार
वृत्तसंस्था/ क्वेटा
पाकिस्तानात सलग दुसऱया दिवशी दहशतवादी हल्ला झाला आहे. खैबर पख्तूनख्वाच्या ऊपरी कोहिस्तान भागात बुधवारी बसमध्ये झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 चिनी इंजिनियर्स, सुरक्षा दलाचे दोन जवान आणि काही मजूर सामील असल्याचे समजते. अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याच दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
दसू धरणाचे काम करणारे चिनी इंजिनियर्स आणि मजूर बसमधून प्रवास करत होते. बसमध्ये सुमारे 30 चिनी इंजिनियर्स होते. बसला पाकिस्तानी सैनिकांची सुरक्षा प्राप्त होती. बसमध्ये अचानक स्फोट झाला. हा हल्ला आहे का दुर्घटना याचा तपास केला जात असल्याचे उपायुक्त मोहम्मद आरिफ यांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी खैबर पख्तूनख्वा येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले होते. यात एका कॅप्टनसह 12 जवानांचा मृत्यू झाला होता. 15 जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी 6 टेलिकॉम ऑपरेटर्सना ओलीस ठेवले होते.
या हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) हात असल्याचे सांगण्यात आले होते. दहशतवाद्यांनी काही जवानांनाही ओलीस ठेवले आहे. या हल्ल्यात 28 बलोच रेजिमेंटचे कॅप्टन अब्दुल बासित याचा मृत्यू झाल्याचे समजते. अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वाढण्यासह पाकिस्तानातही तालिबानी राजवट आणण्याची इच्छा टीटीपीची आहे. टीटीपीने यापूर्वी देखील पाकिस्तानात अनेक मोठे हल्ले घडवून आणले आहेत.
पाकिस्तानी सैन्याचा दावा
खैबर पख्तूनख्वाच्या कुर्रम जिल्हय़ात सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. त्यानंतर तेथे मोहीम सुरू करण्यात आली. गोळीबारात 3 दहशतवादी मारले गेले तर 2 जवान हुतात्मा झाल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आला.