ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका हिंदू मंदिरावर जमावाने हल्ला करून मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
नायला इनायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपरकारमधील चाचरो येथे जमावाने माता राणी भातियानी मंदिरातील पवित्र मूर्ती आणि ग्रंथांची विटंबना केली आहे. तसेच मंदिराची तोडफोड केली आहे. पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये ननकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक झाली होती. तसेच सप्टेंबर महिन्यात सिंध प्रांतामध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला करून मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे पाकिस्तानातील हिंदुंच्या भावना दुखावल्या जात आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करणे शक्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.