अपहरण अन् धर्मांतराला विरोध दर्शविल्याने झाडली गोळी
वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सोमवारी एका हिंदू मुलीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सिंधच्या सुक्कुर जिल्हय़ात मुलीने अपहरणाला विरोध केल्याने अपहरणकर्त्यांनी तिच्यावर गोळी झाडली होती. मृत मुलीचे नाव पूजा कुमारी ओड असून ती 18 वर्षांची होती. तिचे बळजबरीने धर्मांतर तसेच अपहरणाचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर तिची हत्या करण्यात आली.
पूजाच्या हत्येचा मुख्य आरेपी वाहिद बख्श लशारीला अटक करण्यात आली आहे. लशारीकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. आरोपी वाहिद बख्श हा पूजासोबत विवाह करण्यासाठी तिचे अपहरण करू पाहत होता असे सुक्कुर जिल्हय़ाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
सिंधमध्ये हिंदू मुलींचे अपहरण आणि बळजबरीच्या धर्मांतरांच्या अनेक घटना घडतात. परंतु याप्रकरणी हिंदू मुलीने स्वतःच्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचा युक्तिवाद करण्यात येतो. माझ्या मुलीने विवाह आणि धर्मांतरास नकार दिल्यानेच तिची हत्या करण्यात आल्याचे पूजाच्या वडिलांनी म्हटले आहे.
आरोपी मागील अनेक महिन्यांपासून माझ्या मुलीला त्रास देत होता. अनेकदा बळजबरीने आमच्या घरातही घुसला होता. सुक्कुर पोलिसांकडून आम्ही सुरक्षेची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी याकडे डोळेझाक केल्याचे पूजाच्या वडिलांनी सांगितले आहे. पूजाच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर ठेवून निदर्शने केल्याने वाहतूक सुमारे 2 तासांपर्यंत ठप्प झाली होती.
सिंधमधील हिंदू समुदाय संकटात
पाकिस्तानात बळजबरीच्या धर्मांतराच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत. अमेरिकेतील सिंधी फौंडेशननुसार सिंध प्रांतात दरवर्षी सुमारे 1 हजार हिंदू मुलींचे (12-18 वर्षांदरम्यान वय) अपहरण करण्यात येते. त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडविण्यात येते. त्यानंतर मुस्लिमधर्मीयासोबत त्यांना विवाह करण्यास भाग पाडले जाते.