लष्कराने गोळीबार करताच पोबारा ः पूंछमधील घटना
जम्मू / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) एक ड्रोन उडताना दिसला. या घटनेनंतर लष्कराच्या जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर ड्रोन माघारी गेल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली. शुक्रवारी रात्री कृष्णा घाटी सेक्टरमधील बलोनीजवळ नियंत्रण रेषेजवळ ड्रोन उडताना दिसले. सज्ज सैनिकांनी गोळीबार केला आणि ड्रोन पाकव्याप्त काश्मीरमध्ये परतले, असे अधिकाऱयांनी सांगितले. भारतीय हद्दीत छुप्या कॅमेऱयाद्वारे टेहळणी करण्यासाठी सदर ड्रोन पाठवण्यात आला असावा असा संशय आहे. यापूर्वी 6 जुलै रोजी सांबा जिह्यात सीमेजवळ ड्रोन दिसला होता. ड्रोनमधून काही संशयास्पद वस्तू टाकण्यात आल्याच्या संशयाने शनिवारी सकाळी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.