इस्लामाबाद / वृत्तसंस्था
अलीकडील काही दिवसात भारताविरुद्ध आग ओकणाऱया शाहिद आफ्रिदीला शनिवारी घरच्या नागरिकांच्याच संतापाचा बळी व्हावे लागले. कराचीत विमान कोसळले होते, त्या ठिकाणी आफ्रिदी पोहोचला आणि तेथे तैनात बचाव दलाच्या पथकातील सदस्यांनी बचावाचे काम सोडून आफ्रिदीभोवती गराडा घालत फोटोसेशन केले. आफ्रिदीनेही फोटोसेशन करु दिले आणि नंतर काही कालावधीतच संतप्त पाकिस्तानी नागरिकांनी आफ्रिदीचा विविध समाजमाध्यमातून चांगलाच समाचार घेतला.
या दौऱयावेळी आफ्रिदीने उपस्थितांना संबोधित केल्याचेही वृत्त आहे. शाहिद आफ्रिदी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याची छायाचित्रे काही कालावधीत व्हायरल झाली आणि नागरिकांच्या उद्रेकाचा सामना आफ्रिदीला करावा लागला.
पाकिस्तानी नागरिक आबिद हुसेन खान म्हणाला, ‘माझ्या मते पाकिस्तानमधील निवडणूक आयोग पूर्णपणे बरखास्त करायला हवे. यामुळे लाखो-कोटय़वधीची रक्कम चुराडा होणे बंद होईल. निवडणूक आयोग रद्द करुन प्रत्येक वर्षी ऑल पाकिस्तान क्रिकेट लीगमधून कोणत्याही एका क्रिकेटपटूची पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून निवड करता येईल. यंदा इम्रानच्या जागेवर पंतप्रधान होण्यासाठी शाहिद आफ्रिदी सर्वात पात्र वाटतो’.
बुशर गोहरने लिहिले की, ‘मुळात, आफ्रिदीला त्या दुर्घटनास्थळी जाण्याची परवानगीच का दिली गेली, ते मला कळत नाही. तेथे जे बचावकार्यासाठी तैनात होते, त्यांनी आफ्रिदीला तिथून निघून जाण्यास सांगणे आवश्यक होते. पण, तेच आफ्रिदीसोबत फोटो काढून घेण्यात गुंतले. बचाव पथकाच्या प्रमुखाने या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करायला हवी’.